स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या आदेशाने पोलीस पथक १८ ऑगस्ट राेजी गडचिरोली, आरमोरी परिसरात गस्त करीत हाेते. भंडारा जिल्ह्यातून वडसा-आरमोरीमार्गे (एम.एच ४८ पी ४७११) या चारचाकी वाहनाने अवैध देशी-दारूचा पुरवठा गडचिरोली येथे करणार आहेत अशी गाेपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार एलसीबीचे पथक पाेर्ला येथील वडधा गावाकडे जाणाऱ्या टी पॉइंट रोडचे बाजुला आपापले अस्तित्व लपवून व तात्पुरता अडथळा निर्माण करून सापळा रचून बसले हाेते. एक महिंद्रा कंपनीचे चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या येताना दिसले. वाहनचालकास हात दाखवून थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन थांबविले. वाहनाची तपासणी
केली असता त्यामध्ये १ लाख २८ हजार रुपये किमतीची दारू आढळून आली. तसेच दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले आठ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात मारकबाेडी येथील अमाेल नेताजी मेश्राम, कन्हय्या नेताजी मेश्राम (दाेघेही रा. मारकबाेडी ता. गडचिराेली) यांना अटक करण्यात आली आहे.