रस्ते, नाल्यांची अवस्था बकाल : जनजागृतीअभावी शौचालय वापरास अनेक गावात खो लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देसाईगंज तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात शौचालय बांधकामाची जम्बो मोहीम गेल्या दोन-तीन वर्षांपासून राबविली जात आहे. १०० टक्के शौचालयाचे काम पूर्ण करणाऱ्या देसाईगंज तालुक्याला प्रशासनाच्या वतीने गोदरीमुक्त घोषित करण्यात आले आहे. मात्र देसाईगंज तालुक्याच्या अनेक गावात प्रभावी जनजागृतीअभावी शौचालयाचे वापरच होत नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. याशिवाय तालुक्याच्या अनेक गावात नाल्या तुडूंब भरल्या असून रस्त्याची दुरवस्था आहे. त्यामुळे स्वच्छ, सुंदर व गोदरीमुक्त देसाईगंज तालुक्याच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देसाईगंज तालुक्यात एकूण १९ ग्राम पंचायती असून यातील काही ग्राम पंचायतींनी शासनाच्या अनेक उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग दर्शवून रोख पारितोषिकेही पटकाविली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात लहान व प्रगतशील तालुका म्हणून देसाईगंज तालुक्याची ओळख आहे. कुरूड, कोरेगाव, कोंढाळा, विसोरा, बोडधा, आमगाव ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. इतरही गावांची लोकसंख्या त्या खालोखाल आहे. मात्र गावात प्रवेश केल्यावर अनेक गावांमध्ये ग्राम पंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आता मृग नक्षत्राची सुरुवात झाली असून पावसाने दस्तकही दिली आहे. जोरदार पावसापूर्वी गावातील नाल्यांची स्वच्छता तसेच दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची डागडुजी करणे अत्यावश्यक आहे. याशिवाय ब्लिचिंग पावडर पुरवठा, पाणीस्त्रोत तपासणी व शुद्ध पाणीपुरवठा तसेच पथदिव्यांची व्यवस्था होणे आवश्यक आहे. मात्र काही मोजक्या ग्राम पंचायती वगळता इतर अनेक ग्राम पंचायती गावातील मूलभूत समस्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहेत. विशेष म्हणजे बऱ्याच गावात नागरिकांना दूषित पाणीच प्यावे लागत आहे. अनेक ग्राम पंचायतीकडे घंटागाड्या उपलब्ध नाहीत. तालुक्याचा ग्रामीण भाग गोदरीमुक्त करण्यासाठी शासनाने स्वच्छ भारत मिशनमधून ‘घर तिथे शौचालय’ ही संकल्पना अंमलात आणली. शासकीय अनुदानाच्या रकमेतून अनेक गावात शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अनेक ग्राम पंचायतीमार्फत अद्यापही बांधकाम पूर्ण केलेल्या शौचालय लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत. त्यामुळे लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहे. देसाईगंज तालुक्याच्या काही गावांमध्ये काही वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. मात्र या ठिकाणी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने सध्या या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. अनेक गावातील सार्वजनिक शौचालय अडगडीत पडले आहेत. काही गावांमध्ये सार्वजनिक शौचालय बांधून तयार आहेत. मात्र ही शौचालये उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी अनेक गावांच्या परिस्थितीवरून विदारक वास्तव पुढे आले आहे. देसाईगंज तालुक्यातील काही गावांना पुरस्कार मिळाला. मात्र या गावांची बकाल अवस्था पाहिल्यानंतर सदर गावे खऱ्या अर्थाने निर्मल व गोदरीमुक्त झाली काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
तालुका गोदरीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
By admin | Published: June 11, 2017 1:30 AM