गडचिरोली : गडचिरोली हा दारूबंदी असलेला जिल्हा आहे. मात्र येथे गावागावात देशी, विदेशी, गावठी व मोहफुलाची दारू मोठ्या प्रमाणावर विकल्या जाते. स्थानिक पोलीस ठाण्यांकडून अनेकदा अशा दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यास कानाडोळा केला जातो. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या कार्यालयातून दारूबंदी विरोधात धडक कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत आहे. पोलीस अधीक्षकांच्या या पथकामुळे स्थानिक पोलीस ठाण्याच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्हच लागले असल्याची चर्चा जनमानसात पसरली आहे. १९९३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून दारूबंदी करण्यात आली. परंतु गेल्या २२ वर्षांत या जिल्ह्यात गावागावात अवैध दारू व्यवसाय हा कुटीर उद्योग झाला. गावागावात देशी, विदेशी, गावठी व मोहाची दारू मिळू लागली. या व्यवसायात १० हजारावर अधिक लोक काम करीत आहे. तरीही राज्य शासनाच्या लेखी गडचिरोली जिल्हा दारूबंदी आहे. आता शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदीची घोषणा केली आहे. बंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक तैनात केले आहे. या पथकाने नुकतीच कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा व गडचिरोली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाकडी येथे धाड घातली व दारूविक्रेत्यांवर कारवाई केली. यापूर्वीही या पथकाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. भामरागड येथे गतवर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या पुढाकारातून महिलांनी दारू पकडून दिली होती. या पथकामुळे स्थानिक पोलीस ठाण्यातील बिट जमादार व अधिकारी यांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची वेळ आली आहे. स्थानिक पोलीस दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत नसल्याने नागरिक पोलीस अधीक्षकाच्या पथकाला माहिती देत आहे. त्यामुळे या बाबीची पोलीस अधीक्षकांनही दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलीस ठाण्यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह
By admin | Published: March 30, 2015 1:24 AM