पुनर्वसित अरतताेंडी गावाला मिळालेली जमीन.
देसाईगंज : तालुक्यातील डोंगरगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या जुनी अरततोंडी या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पुनर्वसनाच्या नावाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमची फसवणूक केली आहे, असा आराेप येथील नागरिकांनी केला आहे. मूलभूत सुविधा जुन्याच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी अरततोंडी या गावाची लोकसंख्या सद्य:स्थितीत अंदाजे ८०० च्या घरात असून, यापैकी ३०३ नागरिकांनी किन्हाळ्याजवळील पुनर्वसित ठिकाणी स्थलांतर केले आहे. येथे घरासाठी व शेतीसाठी देण्यात आलेली जागा निरुपयोगी असल्यामुळे याठिकाणी बांधण्यात आलेल्या घरांना अल्पावधीतच तडे जाऊ लागले आहेत, तर खडकाळ व निरुपयोगी शेतजमिनीमुळे जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सन १९९४ मध्ये लगतच्या गाढवी नदीला आलेल्या पुराने गावाला चारही बाजूंनी वेढल्याने येथील नागरिकांच्या जगण्या- मरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन स्थिती पाहता या गावाचे किन्हाळ्यानजीक पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी घर बांधकामासाठी ५० बाय ६० स्क्वेअर फूट जागा व २५ हजार रुपये कर्जाऊ स्वरूपात देण्यात आले होते. शेतीसाठी देण्यात आलेली जागा निकृष्ट व निरुपयोगी असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरिकांनी आरमोरी तालुक्यातील पळसगावनजीकच्या बोरकनार या परिसरात घरासाठी व शेतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली व याठिकाणी पुनर्वसन करण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, प्रशासकीय यंत्रणेने वन विभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यास नकार दिला. दरम्यान, नागरिकांनी नवीन ठिकाणी जाण्यास स्पष्ट नकार देत जुन्याच ठिकाणी वास्तव्यास राहून पूर्वापर शेतीच्या भरोशावरच उदरनिर्वाह करीत आहेत.
वर्तमानस्थितीत गावाचे पुनर्वसन करण्यात आल्याने याठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास नकार दिला असला तरी येथील अनेक कुटुंबांना घरकुल, शाैचालय याेजनेचा लाभ देण्यात आला. गावातील विद्युत पुरवठा नियमितपणे सुरू असून, गाव मुख्य मार्गाशी पक्क्या मार्गाने जोडण्यात आले आहे. गावात तीन सार्वजनिक विहिरी असून, येथील विंधन विहिरीवर सौर ऊर्जेवर आधारित टँक बसवून पाणीपुरवठा केला जात आहे.
गावालगत असलेल्या शेतजमिनी सुपीक असल्यामुळे उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर दुबार, तिबार पीक घेतले जात आहे. उपजीविकेचे साधन उपलब्ध असताना प्रशासकीय यंत्रणेने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याऐवजी नागरिकांची दिशाभूल करून अडगळीत ठेवल्याने जुन्या गावातच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. कोणत्याही स्थितीत गाव सोडून पुनर्वसनाच्या ठिकाणी जाणार नसल्याचा पवित्रा बऱ्याच नागरिकांनी घेतल्याने प्रशासकीय यंत्रणा काेणता निर्णय घेेते, याकडे लक्ष लागले आहे.
बाॅक्स ....
मूलभूत सुविधांचा अभाव
सद्य:स्थितीत या गावात एकूण १२० घरांत ११५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. गावात इयत्ता पहिली ते चाैथीपर्यंतची प्राथमिक शाळा असून एकाच शिक्षकाच्या भरवशावर एकाच खाेलीत ही शाळा भरविली जाते. सदर शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र मुतारी नसून किचनशेडही नाही. अंगणवाडीची इमारत निर्लेखित केली आहे.