लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरूवार आणि शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या सर्व भागात झालेल्या पावसाने तहानलेल्या पिकांना तृप्त केले. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत टांगणीला लागलेला शेतकºयांचा जीव भांड्यात पडला आहे.जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या धानाला सध्या पावसाची गरज होती. आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या सरासरीएवढा पाऊस झाला असला तरी गेल्या १५ ते २० दिवसांत पावसाने हजेरीच न लावल्याने धान पीक सुकण्याच्या मार्गावर होते. पाऊस न आल्यास धान योग्य प्रकारे भरणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली होती. याशिवाय इतर पिकही संकटात आले होते. मात्र शेवटच्या क्षणी वरुणराजाने दया दाखवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात ३२.३ मिमी पाऊस झाला. त्यात चामोर्शी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासात जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.गुरूवारी रात्री बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ४० पैकी ४ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात सर्वाधिक चामोर्शी ९३ मिमी, कुनघाडा ७१ मिमी, येनापूर ७३.८ मिमी, आष्टीत ७१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यात वार्षिक पावसाची सरासरी १३५४ मिमी आहे. आतापर्यंत १३०९ मिमी पाऊस झाला असून हे प्रमाण ९६ टक्के आहे. लवकरच वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता आहे.इंजिन व कृषीपंप थांबलेप्रतीक्षा करूनही पाऊस होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी इंजिन व कृषीपंपांच्या सहाय्याने पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र आता इंजिन व कृषीपंप बंद झाले आहेत.
तहानलेल्या पिकांना पावसाने केले तृप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:29 AM
गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरूवार आणि शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या सर्व भागात झालेल्या पावसाने तहानलेल्या पिकांना तृप्त केले.
ठळक मुद्देदोन दिवस हजेरी : शेतकऱ्यांचा जीव भांड्यात