गडचिराेली : केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून प्रशासनाच्या वतीने शहर विकासाची कामे गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून केली जात आहेत. मात्र या कामांचे याेग्य नियाेजन व दूरदृष्टिकाेन नसल्याने निधी खर्च हाेऊनही शहराच्या काही भागांतील समस्या अजूनही मार्गी लागल्या नाही. असाच काहीसा प्रकार राधे बिल्डिंगच्या मागील परिसरातील कन्नमवारनगरात दिसून येत आहे. पावसाचे व सांडपाण्याचा याेग्य निचरा हाेत नसल्याने येथील सीसी राेडवर बारमाही पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे.
शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या मागील भागात असलेल्या जंगलातून पावसाचे पाणी विवेकानंदनगरातून कन्नमवारनगराकडे येते. पावसाचे पाणी जाण्याचा सध्यातरी हाच मार्ग आहे. न. प. प्रशासनाच्या वतीने कन्नमवार वाॅर्डात सीसी राेड, नाली बांधकाम व ओपन स्पेस आदी विकासकामे करण्यात आली. त्यामुळे त्या भागातील बऱ्याचशा कुटुंबांना दिलासा मिळाला. मात्र कन्नमवारनगरातील सांडपाणी व पावसाच्या पाण्याची मुख्य समस्या अजूनही कायम आहे. शिक्षक निशाने व चुडाराम बल्ल्हारपुरे यांच्या घराजवळ न. प. प्रशासनाच्या वतीने सुंदर व आकर्षक ओपन स्पेसचे काम पूर्ण करण्यात आले. यामध्ये नगरसेवक सतीश विधाते यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण राहिला. त्या भागातील अनेक अंतर्गत रस्ते गुळगुळीत करण्यात आले. मात्र पावसाचे व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत याेग्य नियाेजन करण्यात न आल्याने राधे बिल्डिंगच्या मागील परिसरात शिक्षक प्रमाेद वरगंटीवार यांच्या घरासमाेरील रस्त्यावर बारमाही पाणी साचून असते. जाेरदार पाऊस झाल्यास हा मार्ग व राधे बिल्डिंगलगतचा मार्ग पूर्णत: पाण्याखाली येताे. दरम्यान, वळणावरच्या घरांना दाेन ते तीन फूट इतका पाण्याचा विळखा बसताेे.
या समस्येबाबत स्थानिक नागरिकांना अनेकदा न. प. प्रशासनाकडे तक्रारी केल्या, निवेदनही दिले. मात्र ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली नाही. परिणामी या भागातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात पाण्यातूनच चारचाकी, दुचाकी व सायकली काढाव्या लागत आहेत. या भागातील विद्यार्थ्यांनाही आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
याच परिसराला लागून असलेल्या चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असून, एका बाजूचा रस्ता गेल्या दीड महिन्यांपासून खाेदून ठेवण्यात आला आहे. साेमवारी सकाळच्या सुमारास दमदार पाऊस बरसला. दरम्यान, या पावसाचे पाणी खाेदकाम झालेल्या रस्त्यावर साचले. त्यामुळे चामाेर्शी महामार्गाच्या एका बाजूच्या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
बाॅक्स...
आशीर्वादनगरातील रस्ते पाण्याखाली
राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय मंदगतीने हाेत असून, चुकीच्या पद्धतीने हाेत आहे. एका बाजूच्या रस्त्यालगतची जुनी नाली पूर्णत: बुजविण्यात आली आहे. साेमवारी झालेल्या पावसाचे पाणी आशीर्वादनगरातील रस्त्यावर साचले. राधे बिल्डिंगच्या समाेरून काशीनाथ भडके यांच्या घराकडे जाणारा रस्ता साेमवारी सकाळी पूर्णत: पाणीखाली आला हाेता. राष्ट्रीय महामार्गाच्या नियाेजन शून्य कामामुळे आशीर्वादनगरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बाॅक्स...
खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष
चामाेर्शीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या सदाेष कामामुळे या मार्गावरून आवागमन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्रास हाेत आहे. या मार्गावर केमिस्ट भवनाजवळ नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या पुलाजवळच्या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडले आहेत. गेल्या दाेन महिन्यांपासून हे खड्डे कायम आहेत. मात्र हे खड्डे बुजविण्याचे औदार्य प्राधिकरणाने अजूनही दाखविले नाही. या ठिकाणाहून वाहने अतिशय धाेकादायक स्थितीत चालवावे लागतात. भरपावसात सायंकाळच्या सुमारास येथे अनेक दुचाकीस्वार पडले आहेत.