गडचिरोली : मागील पाच दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली तालुक्यात मंगळवारच्या रात्री सुमारे २४० मीमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. रात्री १२ वाजेपासून सकाळी ९ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. गडचिरोली शहराच्या सखल भागात पाणी साचल्याने या भागांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंगळवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याने गडचिरोली शहरातील अनेक शाळांना सुट्या देण्यात आल्या. शहरात १० पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. मार्गांवर पाणी साचल्याने नागरिकांना कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागला. दुपारी ९ नंतर मात्र पावसाने उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले. लहान नाल्यांमुळे चामोर्शी जलमय चामोर्शी-गडचिरोली मुख्य मार्गावरील शिवाजी शाळेजवळील रस्त्यावरून पाणी वाहत राहते. शिवाजी हायस्कूल व यशोधरा विद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ते तीन फूट पाणी जमा होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या मार्गाने जाताना अडचण निर्माण होते. या दोन्ही शाळेच्या मागच्या बाजूस गोंडाई तलाव आहे. या तलावाचे पाणी निघत असल्याने परिसरात पाणी साचून राहते. या ठिकाणी पुलाची उंची वाढवून पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचा आकार मोठा केल्यास ही समस्या दूर होईल. शालेय परिसरात व रस्त्यावर पाणी साचणार नाही. त्यामुळे नगर पंचायतीने नाल्यांचा आकार वाढवून उंच पूल बांधावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी केली आहे.
पावसाचा तडाखा
By admin | Published: July 13, 2016 2:13 AM