लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामासाठी पऱ्हे टाकल्यानंतर रोवणीची वेळ आली असताना पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. तो आता भांड्यात पडला आहे.रोवणीसाठी पऱ्हे खोदणीच्या कामालाही गुरूवारी अनेकांनी सुरूवात केल्याचे चित्र दिसून आले. गुरूवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २३.३ मिमी पाऊस झाला. त्यात सर्वाधिक १२० मिमी पाऊस देसाईगंज तालुक्यात झाला आहे. याशिवाय गडचिरोली तालुक्यात २२ मिमी, कुरखेडा ५०.३, आरमोरी ३१.१ मिमी, चामोर्शी १.२ मिमी, सिरोंचा १.८ मिमी, अहेरी १.९ मिमी, धानोरा १९.३ मिमी, कोरची ३०.९ मिमी आणि भामरागडमध्ये १.१ मिमी पाऊस झाला. एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यात मात्र गुरूवारी सकाळपर्यंत पाऊस नव्हता. दिवसभरात तिथेही पाऊस झाला.
गडचिरोली-चामोर्शी मार्ग गोविंदपूरजवळ झाला ठप्प
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वर गडचिरोली ते चामोर्शीच्या मध्ये गोविंदपूर नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तात्पुरती वाहतूक वळती करण्यात आली. नाल्याचे पाणी काढण्यासाठी पाईप टाकून तात्पुरता रपटा बनविण्यात आला. बुधवारच्या रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाल्याचे पाणी रपट्याच्या वर आले. यात रपट्याचा काही भागही वाहून गेल्याचे समजते. त्यामुळे गडचिरोलीकडून चामोर्शी आणि दक्षिणेकडील सर्व तालुक्यांकडे जाणारी वाहतूक कुनघाडा, पोटेगाव या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता ए.पी.लंजे यांनी कळविले.
खंडीत पावसामुळे कपाशी तेजीत- चामाेर्शी, मुलचेरा, अहेरी, गडचिराेली सिराेंचा या तालुक्यांमध्ये धानाबराेबरच कापूस पिकाची लागवड केली जाते. सुरूवातीच्या कालावधीत कापूस पिकाला अत्यंत कमी पावसाची गरज भासते. नेमका तेवढाच पाऊस आजपर्यंत पडला. त्यामुळे धानाच्या राेवणीची कामे लांबली असली तरी कपाशीचे पीक मात्र तेजीत असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी कपाशीमध्ये डवरण करून निदंन केले. सध्या कपाशीवर काेणत्याही राेगाची लागण झाली नसल्याने शेतकरी आनंदी असल्याचे दिसून येत आहे. गुरूवारच्या पावसानंतर काही शेतकऱ्यांनी राेवणीला सुरूवात केली.- मुलचेरा तालुक्यात केवळ २० हेक्टर क्षेत्रावर धान राेवणी झाली आहे. ३०४ हेक्टरवर पऱ्हे टाकले आहेत. तर १६९ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे.