मूल मार्गावरील बसफेऱ्या वाढवा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक मूल, चंद्रपूरला ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच प्रवाशांची वर्दळ राहते. त्या तुलनेत बसफेऱ्या कमी आहेत. परिणामी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. आता अनलाॅक झाल्यापासून विवाह साेहळे सुरू झाले आहेत. परिणामी प्रवाशांची संख्या वाढल्याने बसफेऱ्यांची गरज आहे.
अर्धवट पुलावरून खडतर प्रवास
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ कि.मी. अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.
सिरोंचा शहरात डुकरांचा हैदोस
सिरोंचा : तालुका मुख्यालयी डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा प्रचंड प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
कुंपणाअभावी शेतीचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तारेचे कुंपण महाग असल्याने नागरिक तार खरेदी करू शकत नाही.
चौक व बाजार परिसरात स्वच्छतागृहे उभारा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी जागा नाही. काही नागरिक इंदिरा गांधी चौकात असलेल्या सभागृहात लघुशंका करतात. त्यामुळे दुर्गंधी आहे.
कमलापुरात भ्रमणध्वनी सेवा कुचकामी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात शासनातर्फे भारतीय दूरसंचार निगमची भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यात आली. करोडो रुपये खर्च करून रेपनपल्ली येथे बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचा मनोरा उभारण्यात आला. मात्र, या टॉवर रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा कुचकामी ठरली आहे. परिणामी जनता त्रस्त झाली आहे.
कचऱ्याच्या ढिगांमुळे स्वच्छतेची ऐशीतैशी
अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्याच्या अगदी बाजूला कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे स्वच्छतेची वाट लागत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासनातर्फे विविध योजना, तसेच स्पर्धा आयोजित करून गावांमध्ये स्वच्छता राहील, यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गावकरी गावात स्वच्छता ठेवत आहेत.
शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी
चामाेर्शी : आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे योजनांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागात योजनाच पोहोचल्या नाही. राज्य शासनाने निधीची तरतूद करावी, अशी मागणी आहे.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा
गडचिरोली : जिल्हाभरातील वन विभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाकडांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
पशुपालन योजनांची जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
उपहारगृहांमध्ये नियमांचे उल्लंघन
गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.
गांधी वॉर्डात फवारणीची मागणी
गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या आहेत. यातील बहुतांश नाल्या उपसल्या जात नाही.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
गडचिरोली : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायतस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते.
मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून, अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.
रस्त्यावर कचरा; कारवाई करा
देसाईगंज : घंटागाडी वॉर्डात फिरत असतानाही या घंटागाडीत कचरा टाकत नाही. उलट काही लोक तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कठड्यांअभावी अपघाताची शक्यता
चामोर्शी : अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्या सुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. कठडे नसल्याने अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेड उभारण्याची मागणी
गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराचा चामोर्शी मार्गावर थांबा देण्यात आला आहे; मात्र या ठिकाणी शेड नसल्याने प्रवासी भर उन्हात बसची प्रतीक्षा करीत असतात. या बसथांब्यावरून अनेक प्रवासी चामोर्शी, अहेरीकडे ये-जा करतात.
विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. या विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे.
पट्टे वाटपासाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचा दाखला जोडावा लागतो. या अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.
पर्यटनस्थळांचा विकास रखडला
कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे आहेत; पण या ठिकाणी अजूनही सोयीसुविधा नाहीत. या पर्यटनस्थळांचा विकास केल्यास पर्यटकांची गैरसोय होणार नाही. पर्यटनस्थळे असतानाही केवळ शासनाची मान्यता व निधी मिळत नसल्याने त्यांची वाताहत होत आहे.
याेजनांबाबत जनजागृतीचा अभाव
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
गाळ उपशाअभावी नाले तुंबले
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर देण्याची मागणी आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जमा झाले होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला. सध्या नाल्या तुंबल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे गाळाचा उपसा करावा, अशी मागणी हाेत आहे.
मुलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरं हैदोस घालत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सातत्याने मागणी करूनही नगरपंचायत प्रशासनाने माेकाट डुकरांचा बंदाेबस्त केला नाही.
भामरागड तालुक्यात लाइनमनची पदे भरा
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते, तसेच एका लाइनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावाला सारखाच वेळ देणे शक्य होत नाही.
नागाेबा देवस्थान दुर्लक्षित
गडचिरोली : येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन कि.मी. अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते. साेयीसुविधांकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
रायगट्टा पुलावर कठडे उभारण्याची मागणी
अहेरी : तालुक्यातील रायगट्टा पूल कमी उंचीचा व अरुंद असून, पुलावर कठडे उभारण्यात आलेले नसल्याने वाहन पुलाच्या खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. कठडे नसल्याने जनावरेसुद्धा जखमी झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी कठडे उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
देसाईगंज : दिवसेंदिवस देसाईगंज शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगर परिषदेकडे केली आहे. मात्र, याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.
खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण केव्हा?
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, आंबेशिवणी, भिकारमौशी, राजगाटा, उसेगाव, आदी गावातील शेकडो नागरिक ये-जा करतात.
मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करा
सिरोंचा : दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
मध संकलनाचे प्रशिक्षण द्या
धानोरा : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली, आदी गावांचा संपर्क आहे.
रस्त्याच्या बाजूची झाडे धोकादायक
गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने दिसत नाही. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडपे तोडण्याची गरज आहे. गडचिराेली-आरमाेरी या मार्गावर अनेक ठिकाणी झाडेझुडपे वाढले आहेत. सायंकाळच्या सुमारास दुचाकीस्वारांना झुडपे दिसत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशुमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीजजोडणी मिळाली नाही.