उन्हाळ्यात पाण्याच्या पातळीत घट हाेऊन जंगलातील पाणवठे, वन तलाव व नाले कोरडे पडतात. वनविभाग दरवर्षी कृत्रिम पाणवठे तयार करताे; परंतु या माध्यमातून आवश्यक प्रमाणात वन्यप्राण्यांची तृष्णा भागविली जात नाही. यामुळे असंख्य वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत शेतातील विहिरी, नदी-नाले, तलाव आदींचा आश्रय घेतात.
वन्यप्राणी जंगलाबाहेर पडल्यानंतर विहिरींमधील पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. यावेळी खोल विहिरीत कोसळून त्यांना इजा होते किंवा गाळात फसून, पाण्यात बुडून मृत्यू होतो. उन्हाळ्यात बरेच शेतकरी कोणत्याही पिकांचे उत्पादन घेत नाहीत. यामुळे शेतात त्यांचे जाणे-येणे राहत नाही. यामुळे विहिरीत प्राणी काेसळून मृत्यू झाला तरी माहीत हाेत नाही.
बहुतांश शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीचे बांधकाम करताना केवळ जमिनीला समांतर बांधकाम केले आहे, तर काही शेतकऱ्यांनी नुसती विहीर खोदून ठेवली; पण बांधकाम केले नाही. यामुळे पाळीव प्राणी, माणसेसुद्धा पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब गंभीर असून, यामुळे शेतकरी आणि वनविभागाने पुढाकार घेऊन विहिरींसभाेवताली संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी केली आहे.
बाॅक्स
संरक्षक कठडे बांधणे सक्तीचे करा
शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शासनाकडून सिंचन विहिरींचा लाभ दिला जाताे. या याेजनेतून शेतकरी विहिरींचे बांधकाम करतात; परंतु अनेक जण विहिरीला कठडे बांधत नाहीत. जमिनीच्या पृष्ठभागाला समांतर विहीर बांधली जाते. त्यामुळे अनेक प्राणी पाण्याच्या शाेधात विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. हा धाेका टाळण्यासाठी शासनाने सिंचन विहिरींचे बांधकाम करताना किमान ३ ते ४ फूट उंच संरक्षक कठडे बांधणे अथवा उभारणे शेतकऱ्यांना सक्तीचे करावे, अशी मागणी अजय कुकडकर यांनी केली आहे.