लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : युनेस्कोतर्फे चीनमधील शेंजेन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी कुरखेडा येथील श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची निवड करण्यात आले आहे.१५ व १६ जून रोजी होणाऱ्या या परिषदेचा विषय ‘उच्च शिक्षणातील गुणवत्तेची हमी व आव्हाने’ हा आहे. आशिया खंडातील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. भारतातून केवळ तिघांना अशी संधी मिळाली असून, त्यात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचा समावेश आहे. उच्च शिक्षणात गुणवत्तेची हमी देण्याबरोबरच उच्च शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या गरजा, नावीन्यपूर्ण संशोधन व आव्हानांवरही या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. शिवाय गुणवत्तेच्या हमीसंदर्भात अपारंपरिक शैक्षणिक पद्धतींबाबत जागृती निर्माण करण्यावरदेखील परिषदेत विचारविमर्श होणार आहे. आतापर्यंत डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून, त्यांनी विविध शैक्षणिक परिषदांमध्येही सहभागी होऊन आपले योगदान दिले आहे.
"युनेस्को"च्या राष्ट्रीय परिषदेसाठी राजाभाऊ मुनघाटे यांची निवड
By admin | Published: June 16, 2017 12:56 AM