लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/राजाराम : राजाराम ते छल्लेवाडा मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे पडले होते. यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करणे कठीण जात होते. राजाराम पोलिसांनी पुढाकार घेत मार्गाची दुरूस्ती केली. जवानांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.राजाराम ते छल्लेवाडादरम्यान नाला आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे नाल्याला पूर आला होता. पुलावरून पाणी वाहत होते. परिणामी या ठिकाणचे डांबर पूर्णपणे उखडून गेले. या ठिकाणी मोठे खड्डे पडले होते. खड्ड्यांमुळे या ठिकाणावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना त्रास होत होता. मोठ्या खड्ड्यांमुळे या ठिकाणावरून चारचाकी वाहन पुढे जाणे शक्य नव्हते. परिणामी बसफेरी सुद्धा बंद करण्यात आली होती. राजाराम येथील नागरिकांना छल्लेवाडा व कमलापूर येथे जाणे अशक्य होते. परिणामी विद्यार्थ्यांना सायकल किंवा पायदळ कमलापूर येथे यावे लागत होते. पुन्हा पाऊस होऊन या मार्गावरील खड्ड्यांचा आकार वाढण्याची शक्यता अधिक होती. ही बाब लक्षात आल्यानंतर राजाराम उपपोलीस स्टेशनचे पोलीस जवान, सीआरपीएफ अधिकारी व जवानांनी श्रमदान करून पुलावरील खड्डे बुजविले आहेत. खड्डे बुजल्याने या मार्गावरून वाहन जाऊ शकणार आहे. खड्डे बुजविण्याच्या कार्यात सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक धमनराम जाट, पोलीस उपनिरीक्षक बाबुराम खटावकर, भोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.खड्डे पडलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रिट भरण्यात आले आहे. त्यामुळे किमान पावसाळाभर या ठिकाणी खड्डे पडणार नाही.
राजाराम पोलिसांनी केली रस्त्याची दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:20 PM
राजाराम ते छल्लेवाडा मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे पडले होते. यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करणे कठीण जात होते. राजाराम पोलिसांनी पुढाकार घेत मार्गाची दुरूस्ती केली. जवानांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
ठळक मुद्देवाहतूक सेवा झाली होती विस्कळीत : सिमेंट काँक्रिट टाकून रस्ता खड्डे बुजविले