लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : घरगुती वापराच्या गॅसच्या किमती भरमसाठ वाढून सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यांचे पार्सल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे पोस्टाने पाठविले. याशिवाय आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांना निवेदनही सादर केले.महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या प्रधानसेवकांनी उज्ज्वला गॅस योजना आणली. दुसरीकडे दर १५ दिवसांनी गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या जात आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा चुलीकडे चला, असे म्हणण्याची वेळ आली असल्याची भावना यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी गॅस, पेट्रोल, डिझेलची सातत्याने दरवाढ करून केंद्र सरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे त्या म्हणाल्या.या आंदोलनात एटापल्ली तालुका महिला अध्यक्ष ललिता मडावी, शहर उपाध्यक्ष सरिता गावडे, युवती तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती बेबीताई लेकामी, जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशी, बेबी हेडो, नलिनी आतकमावार, सुषमा गड्डमवार, भावना गड्डमवार, अनिता कांबळे, सुनीता कांबळे, अक्षता पर्वतलवार, सुरेखा गड्डमवार आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
रक्षाबंधनाच्या ओवाळणीसाठी भावाला रिटर्न गिफ्टकाही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे भाव २५ रुपयांनी वाढवून देशातील आपल्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली. वर्षभरात पंतप्रधान अधूनमधून आपल्या बहिणींना ही ओवाळणी महागाईच्या स्वरूपात देतच असतात. याच प्रेमाखातर आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसमार्फत आपल्या प्रधानसेवकांना रक्षाबंधनाचं रिटर्न गिफ्ट म्हणून महागाईचे प्रतीक असलेल्या शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या असल्याचे एटापल्ली शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.