गाेपाल लाजूरकर
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील चपराळा अभयारण्य दुर्मीळ राज्यप्राणी शेकरूंसाठी प्रसिद्ध आहे. हा दुर्मीळ प्राणी येथे आढळत असतानाच येथे शेकरूच्याच कुळातील उडती खार आढळली. चामाेर्शी तालुक्याच्या पाेतेपल्ली जंगलात शुक्रवार ४ फेब्रुवारी राेजी ही उडती खार आढळली. अनाेख्या वैशिष्ट्यांमुळे हा प्राणी सर्वप्रथम कुतुहलाचाच विषय ठरताे.
जंगल कामगार सहकारी संस्थांमार्फत कुप कटाईचे काम सध्या सुरू आहे. हेच काम करीत असताना मजुरांना एका ठिकाणी अनाेखी उडती खार दिसून आली. याबाबतची माहिती मजुरांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांच्याकडून निरीक्षणानंतर आढळलेला दुर्मीळ प्राणी उडती खार असल्याचे स्पष्ट झाले. घाेट वनपरिक्षेत्रातील पाेतेपल्ली नियतक्षेत्रात खंड क्रमांक ५५२ मध्ये ही खार आढळली.
कशी आहे उडती खार?
सर्वसामान्य खार, माेठी खार व उडती खार असे प्रकार खारींचे आहेत. यात माेठी खार म्हणजे शेकरू. उडती खार ही उडत नाही तर ती उड्या मारते. ही स्क्युरिडे कुळातील उंदराची एक प्रजाती आहे. पुढील आणि मागच्या पायांमध्ये पसरलेल्या त्वचेच्या पडद्याचा वापर करून ती झाडांवर सहज चढते व जमिनीवरूनही लवकर सरपटते.
कशी आहे शरीररचना?
उडती खारची शरीर रचना अनाेखी आहे. उडती खारीची डोक्यापासून शरीराची लांबी ४३ से.मी. व शेपटी ५० ते ५२ से.मी. असते. पाय काळे, राखाडे व तपकिरी रंगाचे असतात.नाक फिक्कट गुलाबी काळपट असते. त्यावर काळ्या मिशा असतात. डाेळे टप्पाेरे, कान गाेलाकार व ओंजळीसारखे असतात. पुढे आणि मागच्या पायांपासून फिक्कट रंगाचा पडदा जुळलेला असताे, ह्या पडद्यामुळे तिला झाडांमध्ये सहज सरकता येते. ही खार सर्वभक्षी असते व झाडांसह बिळातही राहते.
उडती खार म्हणजे शेकरू नव्हे !
शेकरू व उडती खार ही एकच आहे, असा गैरसमज अनेकांचा हाेताे. त्यांचे कूळ जरी एकच असले तरी वेगवेगळ्या प्रजाती आहेत. जाॅयन्ट स्क्विरल म्हणजे माेठी खार (शेकरू) तर फ्लाईंग स्क्विरल म्हणजे उडती खार हाेय. त्यामुळे उडती खार म्हणजे शेकरू नव्हे. गडचिराेली, गाेंदिया, अमरावती यासह राज्याच्या अन्य भागात उडती खार आढळते, असे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी सांगितले.