कृषीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्याने अनेकजण यंत्राचा वापर करून शेती कसतात. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात हाेती. परंतु, बैल राखण्यासाठी गुराखी मिळेना व बैलांच्या संगाेपनाचा प्रश्न यासारख्या समस्यांमुळे अनेकांनी बैलांची विक्री केली. केवळ दुग्ध उत्पादनासाठी अनेक शेतकरी गाई पाळतात. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून हंगामातील कामे ट्रॅक्टरने करीत आहेत. अनेक गावांत ट्रॅक्टरची संख्याही वाढली आहे. ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला आहे. ट्रॅक्टरवर मजुरांनाही काम मिळाले आहे. कोंढाळा परिसरात धान लागवड भरपूर प्रमाणात केली जाते. परंतु, दरवर्षी काही ना काही संकट बळिराजासमोर येते. वैनगंगा नदीला आलेला पूर असो की येणारे वादळ आणि गारा पडल्याने धानाचे नुकसान असो, अशा अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागताे. तरीसुद्धा शेतकरी न डगमगता शेती कसताे. मात्र, शेतीची मशागत, पीक लागवड, बी-बियाणे, रोवणीपासून कापणीपर्यंत पैसा खर्च करावा लागताे. सध्या डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचे प्रती तासाचे भाडेही वाढले आहे. मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात तब्बल २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येते.
काेट
शेतीसाठी लागणारी बियाणे, खेते व अन्य खर्चात वाढ झाली असली तरी शेतकऱ्याला शेती करावीच लागेल. शेतकरी शेती वाऱ्यावर साेडेल तर खाणार काय? बियाणे व खतांच्या वाढलेल्या किमती कशाप्रकारे कमी करता येईल यासाठी शासनाने प्रयत्न करावे. तसेच राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून शेतातील संपूर्ण कामे केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा हाेईल आणि मजुरांना रोजगारसद्धा मिळेल.
शालिक बुराडे, शेतकरी काेंढाळा