कुरखेडा : तळेगाव येथील निलंबित रास्त भाव दुकानदाराचा परवाना उपायुक्त यांच्या आदेशानुसार ३ मार्च २०१६ रोजी पूर्ववत करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच दुकानातून शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल करावी, असे आवाहन कुरखेडाचे तहसीलदार यू. एम. तोडसाम यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. तळेगाव येथील रास्त भाव दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. मात्र पुरवठा विभागाच्या उपायुक्तांच्या आदेशानुसार सदर परवाना नियमित करण्यात आला आहे. मात्र या दुकानातून धान्याची उचल करण्यास २७२ शिधापत्रिकाधारकांनी विरोध दर्शवित शिधापत्रिका तहसील कार्यालयात जमा केल्या आहेत. मात्र शिधापत्रिकाधारकांची ही भूमिका संयुक्त नाही, त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या धान्याची उचल करावी, मे महिन्याचे धान्य याच दुकानामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत, असे म्हणणे संयुक्तीक नाही, उपायुक्तांच्या आदेशाबद्दल काही आक्षेप असल्यास वरिष्ठ कार्यालयात पुनर्निरीक्षण अर्ज सादर करून स्थगीती मिळवावी, शिधापत्रिका अन्य रास्त भाव दुकानाला जोडण्याचा अधिकार वरिष्ठ स्तरावर असल्याने त्यांनी ती कायदेशीर बाजू समजून घ्यावी व न्यायीय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यालयात जमा केलेल्या शिधापत्रिका परत घेऊन जाव्यात व धान्याची उचल करावी, असे आवाहन तहसीलदार तोडसाम यांनी केले आहे. यावेळी पुरवठा निरीक्षक कमलेश कुंभरे हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल करावी- तोडसाम
By admin | Published: May 21, 2016 1:28 AM