जिल्हा सत्र न्यायाधीशांचे प्रतिपादन : कोंढाळा येथे विधी सेवा चिकित्सालय केंद्राचा शुभारंभ देसाईगंज : व्यक्ती शरिराला व्याधी झाल्यानंतर तत्काळ स्थानिक वैद्यकीय चिकित्साकडे जाऊन आपण उपचार घेतो व व्याधी बरा करण्याचा प्रयत्न करतो. विधी सेवा चिकित्सालय हे सुध्दा वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी रामबाण उपाय ठरत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले. देसाईगंज तालुका विधी सेवा व देसाईगंज बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायतमध्ये विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. के. जगदाळे, देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल, उपविभगीय अधिकारी दामोधर नान्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, सहायक संवर्ग विकास अधिकारी सुनिता म्हरस्कोल्हे, सरपंच मंगला शेंडे, पोलीस पाटील किरण तुंभलवार, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. वारजुरकर, अॅड. संजय गुरू, अॅड. ढोरे, अॅड. बुध्दे, अॅड. अविनाश नाकाडे, सरकारी अभियोक्ता फुले, अॅड. उईके, अॅड. मनिष शेंडे, अॅड. देशमुख, अॅड. सौदागर, लाँगमार्च खोब्रागडे, पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे म्हणाले, शेजारी व गावातील व्यक्तीशी संबंधित असलेले फौजदारी अथवा दिवाणी स्वरूपाचे वादविवाद गावपातळीवरच निपटावे, न्यायालयाची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यामुळे अनेक वर्ष वादी व प्रतिवादी यांना न्यायालयाची प्रतीक्षा करावी लागते, असे मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी अॅड. बी. डब्ल्यू. पिलारे, छत्रपती ढोरे, धनराज मुंडले, रचना आवळे, राहूल रोकडे, गणेश रामटेके, विनोद उंदीरवाडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
विधी चिकित्सालय वादविवादांवरील रामबाण उपाय
By admin | Published: May 03, 2017 1:31 AM