महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील अरसोडा, रवी व मुल्लूर चक ही तीन गावे मिळून अरसोडा ही ग्रामपंचायत होती. मात्र अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेमध्ये करण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे वाऱ्यावर पडली आहेत. रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे मिळून रवी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी या दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.मात्र या बाबीला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही याबाबत प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे दोन्ही गावे समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. या दोन्ही गावातील नागरिकांना साधे दाखलेही मिळणे कठीण झाले आहे. अनेक मूलभूत सोयीसुविधा व शासकीय योजनेपासून हे दोन्ही गाव वंचित ठरत आहेत. या गावाचा वाली कोणीच नसल्याने ही गावे सध्या निराधार झाली आहेत. रवी व मुल्लूर चक या दोन्ही गावातील नागरिकांच्या समस्येवर फुंकर घालणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ५ जून २०१८ ला आरमोरीला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला. आरमोरी नगर परिषद निर्मितीला लोकसंख्येचा आकडा कमी पडत असल्याने अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेत करण्यात आला. मात्र अरसोडा गावाच्या समावेशाने अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक या गावांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. वास्तविक पाहता आरमोरी नगर परिषदमध्ये अरसोडा ग्रा.पं.मधील तिन्ही गावांचा समावेश झाला असता तर ही समस्या उद्भवली नसती. परंतु तसे न झाल्याने या दोन्ही गावाच्या समायोजनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. इतर ग्रामपंचायतीमध्ये विलिन होण्यास सदर दोन्ही गावातील नागरिकांचा विरोध आहे. एकतर आरमोरी नगर परिषदेमध्ये विलीन करा, नाही तर स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, ही मागणी दोन्ही गावातील नागरिकांची आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अरसोडा ग्रा.पं.चा रेकॉर्ड नगर परिषदेला हस्तांतरीत झाला नाही. त्यामुळे सर्वच विकासकामे ठप्प झाली आहेत.रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे समस्यांच्या विळख्यात सापडलेली आहे. यावर तोडगा काढून या दोन्ही गावांच्या बाबतीत शासन व प्रशासनाने त्वरीत निर्णय घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा.- भारत बावनथडे,जिल्हा सरचिटणीस,भाजयुमो आरमोरीया समस्यांच्या गर्तेत सापडले गावरवी व मुल्लूर चक या दोन्ही गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विविध कामासाठी आवश्यक असणारे दाखलेही मिळणे कठीण झाले आहे. अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून दोन्ही गावे वंचित आहेत. शासन व प्रशासनाने या गावांकडे पाठ फिरविल्याने ही दोन्ही गावे वाडीत टाकल्यासारखी झाली आहेत. रवी व मुल्लूर चक येथील परिसर जंगलव्याप्त असून वाघबाधीत आहे. रात्रो या गावात वाघ व इतर वन्यप्राण्यांच सिरकाव होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील अनेक खांबांचे पथदिवे बंद आहेत. गावाच्या सभोवताल नवीन खांब लावण्यात आले. मात्र पथदिवे लागले नाही. त्यामुळे गावातील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. रोहयोची अनेक कामे मंजूर आहेत. मात्र गावाचा वाली कोणी नसल्यामुळे ही कामेही ठप्प पडलेली आहे. परिणामी गावातील नागरिकांना हक्काचा रोजगार मिळणेही कठीण झाले आहे. अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा येथील नागरिकांना लाभ मिळत नाही. अनेक महिन्यांपासून गावातील नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. हातपंपाजवळ दुर्गंधी पसरली आहे. अशा अनेकविध समस्या या गावात निर्माण झाल्या आहेत. सदर दोन्ही गावाच्या समायोजनाबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस व किती महिने ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न सदर दोन्ही गावातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
रवी व मुल्लूर चक गावे झाली निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:26 AM
तालुक्यातील अरसोडा, रवी व मुल्लूर चक ही तीन गावे मिळून अरसोडा ही ग्रामपंचायत होती. मात्र अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगर परिषदेमध्ये करण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अरसोडा ग्रा.पं.मधील रवी व मुल्लूर चक ही दोन्ही गावे वाऱ्यावर पडली आहेत.
ठळक मुद्देसोईसुविधांपासून वंचित : रवी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्याची मागणी