गडचिरोली : गडचिरोली हा राज्यातील दारू बंदी असलेला जिल्हा आहे. मात्र सध्या जिल्ह्याच्या प्रत्येक गावात दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत २५ हून अधिक दारू दुकानांचे जाळे निर्माण झाले आहे. तसेच जिल्ह्यातील १६०० गावांपैकी किमान १४०० गावांमध्ये दारूची अवैध विक्री सुरू आहे. या व्यवसायात किमान १० हजार तरूण, महिला, वृध्द सहभागी आहेत.शासनाने १९९३ मध्ये या जिल्ह्यात दारू बंदी केली. परंतु ही बंदी आता केवळ कागदावर राहिली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्याच्या सिमा आहेत. तर आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्याची सीमाही लागून आहे. या सर्व ठिकाणावरून गडचिरोली जिल्ह्यात मुबलकपणे दारूचा पुरवठा होतो. गडचिरोली जिल्ह्यात १६०० गावे आहेत. त्यापैकी किमान १४०० गावांमध्ये आजच्या स्थितीत दारूचा व्यवसाय जोर धरून आहे. एकट्या गडचिरोली शहरात दररोज लाखो रूपयाच्या लिटरची दारूची विक्री केली जाते. एका गावात किमान ८ ते १० दुकानदार या अवैध व्यवसायात काम करतात. यामध्ये ५० टक्के महिलांचा सहभाग आहे. पोलीस वर्षाला दारूच्या साधारणत: दारूच्या २०० केसेस नोंद करतात व त्या न्यायालयातही दाखल होतात. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दारूचे कारखाने सुरू आहे. जिल्ह्यातील एका पोलीस उपविभागात महिन्याला अडीच लाखाचा हप्ता पोलिसांना जातो. दिवसाला २ निपा दारू विकून महिना ३ हजार रूपये एका माणसाला मिळतात. त्यामुळे अल्प श्रमात श्रीमंत होण्याचा राजमार्ग ग्रामीण भागात दारूची विक्रीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उत्सवाच्या काळात या दारू विक्रीचे प्रमाण अधिक असल्याने ही दारू उत्सवासाठीही घातक ठरत आहे. जिल्ह्यात उत्सवाच्या आयोजनापूर्वी अनेक पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या सभा घेतल्या जातात. या सभेमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांकडून अवैध दारूविक्रीचा मुद्दा उपस्थित होतो. मात्र पोलीस प्रशासनाने या मुद्याबाबत स्पष्ट भूमीका घेण्याचे टाळतात. अवैध दारूविक्रीमुळे जिल्ह्यातील अनेक सुखी संसार उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)
दारूविक्रीसाठी सीमेवरची दुकाने होताहेत सज्ज
By admin | Published: August 07, 2014 11:57 PM