महेश आगुला / कौसर खान
अंकिसा (गडचिरोली) : ‘घरात अन्नधान्य नाही, होते नव्हते ते पुराने हिरावून घेतले. आता गावात आणि आमच्या घरात काहीच उरले नाही. साचलेला चिखल तुडवत गावात गेलो तरी पुन्हा पुराचे पाणी घरात घुसणार नाही याची हमी कोण घेणार? त्यामुळे सध्या आमच्यासाठी रस्त्यावरचा हा निवाराच जास्त सुरक्षित वाटतो...,’ पूरबाधित सोमनपल्ली या गावातील नागरिकांची ही प्रतिक्रिया त्यांच्या विदारक स्थितीची झलक दर्शवते. ही स्थिती सिरोंचा तालुक्यातील १५ पेक्षा अधिक गावांतील शेकडो कुटुंबांची आहे.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यात तब्बल आठवडाभर पुराने थैमान घातले होते. एकीकडे वरून पडणारा पाऊस, तर दुसरीकडे गोदावरी आणि इंद्रावती नदीच्या पुराचा वेढा अशा जलमय स्थितीने छत्तीसगड सीमेकडील १५ ते २० गावांतील नागरिकांचे सर्वस्व हिरावले गेले. घरामध्ये कमरेभर पाणी शिरले होते. या पुराची पूर्वकल्पना आल्याने प्रशासनाने आधीच या गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवून पूर ओसरेपर्यंत त्यांची सर्व व्यवस्था केली. पण खरे संकट तर आता सुरू झाले. गावात आणि घरात जाणेही शक्य नसल्याने सोमनपल्ली, कोत्तापल्ली, दुपापल्ली यासारख्या काही गावांतील लोकांनी पुराचे पाणी पोहोचू न शकणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर तात्पुरत्या झोपड्या उभारून त्यात वास्तव्य सुरू केले आहे. ‘लोकमत’ने या लोकांची भेट घेऊन त्यांची मन:स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तंबूवजा झोपडीमध्ये राहत असताना या लोकांचे तिथेही हाल आहेच. ना व्यवस्थित खाण्याची सोय, ना विजेची उपलब्धता. रात्रीच्यावेळी थंड हवेत सरपटणाऱ्या आणि विषारी जीवजंतूंचा दंश होण्याची भीती असते. डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरण्याची भीती वाढत आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन हे लोक राहत आहेत.
पहिल्यांदाच का ओढवली ही स्थिती?
- गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून २१० किलोमीटरवर सिरोंचा आहे. तेथून आणखी पुढे ५० किलोमीटरवर असलेले सोमनपल्ली आणि त्या परिसरात असलेल्या नवीन सोमनूर, जुने सोमनूर, पिंडलाया, शुंकरअली, टेकडाताला, गुमलकोंडा, मुत्तापूर, चिंतरवेला, कोत्तापल्ली, अंकिसा अशा अनेक गावांना यावर्षी पहिल्यांदाच महापुराचा फटका बसला. त्याला सर्वस्वी जबाबदार तेलंगणा सरकारने तीन वर्षापूर्वी गोदावरी नदीवर उभारलेला मेडीगड्डा प्रकल्प (लक्ष्मी बॅरेज) ठरला आहे.
जिकडे-तिकडे अतिवृष्टी आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीचे पात्र फुगले आणि अवघ्या दोन दिवसांत मेडीगड्डा प्रकल्पाचे सर्व ८५ गेट उघडून पूर्ण क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला. हे पाणी खालच्या भागात असलेल्या सोमनूरसह अनेक गावांमध्ये शिरले. दुसरीकडे गोदावरीला जाऊन मिळणाऱ्या इंद्रावती नदीचे पाणी गोदावरीत सामावणे कठीण झाल्याने ते पाणी नदीपात्र सोडून परिसरातील गावात आणि शेतात शिरले. त्यामुळे दोन नद्यांच्या पुरात ही गावे सापडली.
पिकं हातून गेली, वर्षभर जगायचे कसे?
या भागात कापसाचे पीक जास्त तर काही प्रमाणात धान लावले जाते. पुराच्या पाण्याने पीकच नाही तर काही शेतकऱ्यांची शेतजमीनही खरडून गेली आहे. खरिपातील पिकांवरच बहुतांश शेतकऱ्यांची मदार आहे. त्यामुळे वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा आणि जगायचे तरी कसे, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
पुनर्वसनाशिवाय पर्याय नाही
मेडीगड्डा प्रकल्पामुळे या भागात दरवर्षी अशा पद्धतीने पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्हाला दुसरीकडे जागा देऊन पुनर्वसन करा, अशी अपेक्षा सोमनपल्लीतील अशोक व्यंकटी पिरला, दिनेश शंकर सडमेक, अनिल रामज शिरला, रवि वीरय्या सोयम आदींनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. या गावकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने अन्नधान्य व इतर साहित्याचे वाटप केले. या भागाला आमदार धर्मरावबाबा आत्राम, काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार आदी नेत्यांनी भेट देऊन त्यांनीही किराणा सामानाच्या किटचे वाटप केले. गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा विषय शासनाकडे लावून धरणार असल्याचा दिलासा त्यांनी गावकऱ्यांना दिला असला तरी हा विषय एवढ्या लवकर मार्गी लागेल का, हाच खरा प्रश्न आहे.