लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे सुरू असून शेतातील काडीकचरा जाळून शेत जमीन स्वच्छ करण्यावर शेतकरी भर देत आहेत. दरम्यान कचरा पेटविण्यासाठी लावलेल्या आगीत तणसीचे ढिग जळून राख होत आहे. परिणामी पशुपालकांसमोर जनावरांच्या वैरणाचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.खरीप हंगामातील धान पिकाची मळणी झाल्यानंतर अनेक शेतकरी आपल्या शेतात तणसीचे ढिग करून ठेवतात. गरजेनुसार या तणसीचा वापर टप्प्याटप्प्याने केला जातो. पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी शेतशिवारात असलेली तणीस घरानजीकच्या गोठ्यामध्ये साठविली जाते. मात्र शेतशिवारातील ही तणीस गोठ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी शेतजमीन स्वच्छतेचे काम शेतकऱ्यांकडून हाती घेतले जाते. दरम्यान शेतातील काडीकचरा पेटत असताना आग वाढत जाऊन तणसीचे ढिगही जळतात. यंदाच्या उन्हाळ्यात चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात तणसीचे ढिग जळाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.शेतीमशागतीच्या कामात मोठा आधार असलेल्या जनावरांचे वैरण आगीमुळे हिसकावल्या जात आहे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा पेटविताना दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतातील आगीमुळे गुरांच्या वैरणाची होताहे राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:56 PM