धानाची विक्रमी खरेदी, मात्र चुकारे थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:52 PM2019-01-03T23:52:55+5:302019-01-03T23:55:08+5:30
आधारभूत धान खरेदी केंद्रांवर यावर्षी धानाची विक्रमी खरेदी झाली आहे. मात्र चुकारे थकले असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील देलनवाडी केंद्रावर मोठ्या प्रमाणात यावर्षी धानाची खरेदी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा/वैरागड : आधारभूत धान खरेदी केंद्रांवर यावर्षी धानाची विक्रमी खरेदी झाली आहे. मात्र चुकारे थकले असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील देलनवाडी केंद्रावर मोठ्या प्रमाणात यावर्षी धानाची खरेदी करण्यात आली आहे. संस्थेचे गोदाम कमी पडत असल्याने धान ठेवण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेतला जात आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले. धानाची मळणी होताच विक्रीसाठी धान केंद्रावर आणले जात आहेत. धानाच्या पोत्यांच्या मोठ्या थप्प्या लागल्या आहेत.
कुरखेडा तालुक्यात एकूण १० धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. २३ नोव्हेंबरपासून एकाही केंद्रावरील धान विक्रीचे चुकारे अदा करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
धानाच्या विक्रीची प्रक्रिया पार पडल्यानंतर केवळ तीन दिवसात रक्कम जमा होईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र आता दीड महिन्याचा कालावधी उलटत चालला असला तरी अजूनपर्यंत चुकारे मिळाले नाही.
काँग्रेस पक्षातर्फे पोषण केल्यानंतर धान खरेदी केंद्र सुरू केले. मात्र चुकारे होत नसल्याने आता शेतकºयांची अडचण वाढली आहे. चुकाºयासाठी काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयंत हरडे यांनी दिला आहे.