लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्र, मेक इन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे २५ व २६ आॅगस्ट रोजी उद्योगविषयी नोंदणी, रोजगार, कामगार मेळावा तसेच मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसांत उद्योगांसाठी सुमारे अडीच हजार बेरोजगारांची नोंदणी व १ हजार ४०० कामगारांची नोंदणी करण्यात आली.२५ ऑगस्ट रोजी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी कामगारांच्या नोंदणीविषयक शिबिर घेण्यात आले. जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावून कामगारांची नोंदणी केली. जिल्हाभरातून सुमारे १ हजार ४०० कामगार आले होते. या सर्वांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना कार्डाचे वितरण सुद्धा त्याचवेळी करण्यात आले. २६ ऑगस्ट रोजी उद्योगविषयक नोंदणी तसेच मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध महामंडळांनी स्टॉल लावले होते. या महामंडळांकडे दोन हजार बेरोजगारांनी नोंदणी केली. तर जिल्हा उद्योग केंद्राकडे ५०० जणांनी नोंदणी केली. या सर्व व्यक्तींना कर्ज उपलब्ध होऊन त्यांनी उद्योग स्थापन करावे, यासाठी मेक इन गडचिरोली प्रयत्न करणार आहे. मेळाव्यात चार कंपन्यांनी युवकांच्या मुलाखती घेतल्या.२६ ऑगस्ट रोजी मेळाव्याचा समारोप करण्यात आला. मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमाला लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशीभूषण वैद्य, खा.अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, चामोर्शीच्या नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, लघु उद्योग भारतीचे प्रशांत जोशी, पं.स.उपसभापती विलास दशमुखे, गोवर्धन चव्हाण, सुधा सेता, माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, भाजपा गडचिरोली तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख आदी मान्यवर उपस्थित होते.संचालन अमोल गुलपल्लीवार यांनी केले. यशस्वीतेसाठी मेक इन गडचिरोलीचे जिल्हा संयोजक रमेश अधिकारी, जॉनी दासरवार, जनार्धन साखरे, वैशाली हुस्के, निर्मला कोटवार यांनी सहकार्य केले.उद्योगासाठी प्रशिक्षण गरजेचे- शशिभूषण वैद्यप्रत्येक व्यवसायात प्रचंड स्पर्धा आहे. यापासून उद्योग सुद्धा सुटले नाहीत. या गळेकापू स्पर्धेत टिकायचे असेल तर उद्योजक सक्षम असला पाहिजे, त्यासाठी त्याला संबंधित उद्योगाबाबतचे प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. यादृष्टीने मेक इन गडचिरोली व इतर विभागही चांगला प्रयत्न करीत आहे, असे गौरवोद्गार लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिभूषण वैद्य यांनी केले. यावेळी त्यांनी उद्योजक व युवकांना उद्योगाविषयी मार्गदर्शन सुद्धा केले.
उद्योगासाठी अडीच हजार बेरोजगारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:40 AM
२५ ऑगस्ट रोजी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी कामगारांच्या नोंदणीविषयक शिबिर घेण्यात आले. जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावून कामगारांची नोंदणी केली. जिल्हाभरातून सुमारे १ हजार ४०० कामगार आले होते.
ठळक मुद्देदोन दिवसीय मेळावा : जिल्हा उद्योग केंद्र व मेक इन गडचिरोलीचा उपक्रम