कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर (वाढोना) येथे पुष्पा रमेश म्हस्के यांचे स्वस्त धान्य दुकान असून कोरोना संकटात मे महिन्यातील नियमित धान्य वाटप आणि प्रधानमंत्री मोफत धान्य वाटप योजनेचा लाभ द्यायचे असताना भगवानपूर येथील स्वस्त धान्य दुकानदाराने प्रत्येक कार्डधारकाकडून अधिकचे १५ रुपये घेतले. याबाबत गावकऱ्यांनी तहसीलदार कुरखेडा यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर या दुकानाची चौकशी करण्यासाठी तहसीलदारांनी स्थानिक तलाठ्याकडे संबंधित दुकानदाराच्या चौकशीचे आदेश दिले. स्वस्त धान्य दुकानाचे दस्ताऐवज तपासल्यानंतर जानेवारी ते मे २०१९ मधील राॅकेल दुकानदाराने उचल करून लाभार्थ्यांना न देता केवळ त्याची रेशनकार्डवर नोंद केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.
लाभार्थ्यांना राॅकेल न देता त्याचे रेशनकार्डवर नोंद करून भगवानपूर येथील स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करून पुष्पा रमेश मस्के यांचेकडून स्वस्त धान्य दुकानाचे अधिकार काढून स्थानिक महिला गटाकडे रेशन दुकानाचे अधिकार द्यावे, अशी लेखी मागणी चरणदास उसेंडी, रमेश कापगते, मिराबाई सोनवणे, तुकाराम मस्के, बाबुराव तुलावी, रमेश ठाकरे, मनीषा मस्के, दयाराम तुलावी आणि गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.