संजय तिपाले, गडचिरोली : छत्तीसगडसह महाराष्ट्रात धडक मोहिमा राबविल्याने धडकी भरलेल्या माओवाद्यांनी २८ मार्च रोजी तेलुगुमधून पत्रक जारी करुन सरकारपुढे युध्दविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. आधी शस्त्रे टाका व आत्मसमर्पण करा, अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर हादरलेल्या माओवाद्यांचे ८ एप्रिल रोजीचे एक पत्रक १० एप्रिल रोजी समोर आले असून त्यात युध्दविरामाचा पुनउर्च्चार केला आहे. जवानांना उद्देशून 'अपने ही लोग है, गोली मत चलावें' अशी विनंती करतानाच बस्तरमधील मोहिमा थांबवून अनुकूल वातावरण बनवावे व शांतीवार्ता करावी , असे नमूद करुन माओवाद्यांनी युध्दविरामाचा चेंडू सरकारकडे टोलविला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यानुसार, गेल्या १५ महिन्यांत ४०० हून अधिक माओवाद्यांना ठार करुन जवानांनी सळो की पळो करुन सोडले आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंड या राज्यात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नक्षल नेता अभय ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती याने पत्रक जारी करुन सरकारपुढे युध्दविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, ८ एप्रिल रोजी उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो रुपेश याचे पत्रक समोर आले आहे. त्यात शांतीवार्तासाठी आम्ही तयार आहोत, पण त्यासाठी अनुकूल वातावरण गरजेचे आहे, अशी भूमिका मांडली आहे.
ही सरकारची जबाबदारी...
पत्रकात म्हटले आहे की, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी युध्दविरामाचा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी अनुकूल वातावरणाची मागणी फेटाळून लावली आहे. मात्र, आत्मसमर्पण हे सगळ्या समस्यांचे उत्तर नाही, यावरुन असे दिसते की सरकारला माओवादविरोधी मोहिमा यापुढेही राबवायच्या आहेत. मात्र, कारवाया थांबविल्या, वातावरण अनुकूल झाले तरच शांतीवार्ता करता येईल, ही सरकारची जबाबदारी आहे.रेशन, वीज, पाणी, आरोग्य सुविधांना विरोध नाही
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि विजापूर सीमावर्ती भागातील एकेली आणि बेलणार परिसरात ३१ मार्चला रेणुका उर्फ बानू या महिला माओवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. याचा उल्लेख पत्रकात असून ती प्रतिकूल परिस्थितीतही लढत राहिल्याचे म्हटले आहे. आम्हाला जनताविरोधी ठरवले जात आहे. मात्र, शाळा, अंगणवाडी, दवाखाना, रेशन, पाणी व वीज या मूलभूत बाबींना कधी विरोध केलेला नाही. एक- दोन विषयांत घाईघाईने चुका झाल्या, त्यानंतर आम्ही माफी मागितल्याचाही उल्लेख पत्रकात आहे.
पत्रक पाहिले आहे. मात्र, माओवाद्यांनी आत्मसमर्पण करणे हाच योग्य मार्ग आहे. त्यांनी हिंसेची वाट सोडावी व आत्मसमर्पण करुन लोकशाही मार्गाने आपले उर्वरित जीवन सुखकर करावे. - नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली