जननी योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
बायोमेट्रिक प्रणालीचा फज्जा
भामरागड : शासनाने कर्मचाऱ्यांच्या नियमित हजेरीकरिता अनेक कार्यालयांत बायोमेट्रिक मशीन बसविलेल्या आहेत. भामरागडातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोडले, तर बऱ्याच कार्यालयात ही बायोमेट्रिक मशीन बंद पडलेली आहे.
अनेक इमारतींवर वीजरोधक यंत्रणा नाही
अहेरी : उंच इमारतींवर वीजरोधक यंत्रणा बसविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या यंत्रामध्ये इमारतींवर वीज कोसळल्यास वीजरोधक यंत्र वीज खेचून घेऊन तिला सुरक्षितरीत्या जमिनीत पोहोचवितो. त्यामुळे इमारतीस व त्यात राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही; परंतु शहरातील अनेक इमारतींवर या यंत्राचा अभाव असल्याचे आढळून आले आहे.
सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षितच
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. शासनाच्या विविध योजना या भागात पोहोचत नसल्याने, नागरिकांमध्येही उदासीनता दिसून येते.
कुरखेडा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवा
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णालयात कुरखेडा, कोरची, देसाईगंज तालुक्यातील रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे १०० खाटांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे; परंतु या मागणीकडे अनेक दिवसांपासून दुर्लक्ष होत आहे. सातत्याने मागणी करूनही आराेग्य विभागाने या रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविली नाही. परिणामी येथून रुग्ण रेफर हाेत आहे.
अतिक्रमणामुळे सिंचन क्षेत्रात घट
कोरची : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून, त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत.
वडधा येथे अनियमित वीजपुरवठा
आरमोरी : वडधा परिसरात मागील आठ दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित होतो.
मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : वननाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अशी मागणी हाेत आहे.
थ्री-जी सेवा बिघडली
एटापल्ली : एटापल्ली येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे.