दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या विसापूर भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती. यासंदर्भात पालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने राज्य शासनाकडे निधीची मागणी करून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने विसापूर भागात पाणी टाकीचे बांधकाम करण्यासाठी मंजुरी प्रदान केली असून याकरिता गडचिरोली नगर पालिकेला २ कोटी १६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने सदर काम सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.यासंदर्भात राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने २० नोव्हेंबर २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सन २०१७-१८ यावर्षाकरिता राज्यातील अनेक नगर परिषदांना राज्य शासनाने एकूण ३१०.४२ कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार गडचिरोली नगर पालिकेला विसापूर भागात पाण्याची टाकी उभारण्यासाठी २ कोटी १६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने या निधीतून जवळपास तीन ते चार लाख लीटर क्षमतेच्या टाकी बांधकामाचा नियोजन प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. सदर पाणीटाकी उभारल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी नळ पाईपलाईन टाकून या टाकीच्या माध्यमातून विसापूर, एलआयसी कॉलनी, सोनापूर कॉम्प्लेक्स तसेच तिरूपती बालाजी मंदिर परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.एकमेव वॉर्डात टँकरने होतो पाणीपुरवठादरवर्षी उन्हाळ्यात वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड खालावत असते. त्यात विसापूर हा चढ भाग असल्याने येथे दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. नळाला पाणी येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीने या एकमेव वॉॅर्डात टँकद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र पाणी टाकी मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक संजय मेश्राम यांनी शासन व प्रशासनाकडे अनेकदा केली होती.वाढीव पाईपलाईनसाठी ५६ लाख मिळालेगडचिरोली शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराच्या चारही दिशेला नव्याने वस्ती होत आहे. अनेक ठिकाणी भूखंड तयार केले जात असून ते विकले जात आहेत. मात्र नव्या वस्तींमध्ये पालिकेतर्फे पुरविण्यात येणारे नळाचे पाणी अद्यापही पोहोचले नाही. वाढीव पाईपलाईनसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पदाधिकारी व प्रशासनाने केली होती. याची दखल घेत राज्य शासनाने गडचिरोली शहरात आवश्यक त्या ठिकाणी वाढीव नळ पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.विसापूर भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण शासनाकडे पाणी टाकीच्या कामासाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर नगराध्यक्षा योगीता प्रमोद पिपरे व आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यांनी आमच्या पाठपुराव्याची दखल घेऊन निधी उपलब्ध करून दिला आहे.- केशव निंबोड, पाणीपुरवठा सभापती,नगर परिषद, गडचिरोली
विसापूर भागातील पाणीटंचाई दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:29 AM
स्थानिक नगर पालिकेच्या विसापूर भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती.
ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : पाण्याच्या टाकीसाठी २ कोटी १६ लाखांचा निधी प्राप्त