गडचिराेली : आलापल्ली-सिराेंचा या राष्ट्रीय महामार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या १०० किमीच्या मार्गावरून वाहने नेताना वाहनधारकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत माेटघरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे केली आहे.
सिराेंचा-आलापल्ली मार्गावर पावसाळ्यातच माेठ-माेठे खड्डे पडले हाेते. मात्र, बांधकाम विभागाने या खड्ड्यांची डागडुजी केली नाही. त्यामुळे खड्ड्यांचा आकार वाढत गेला. स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा निवेदन देऊन केली. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. अहेरी तालुक्यातील अनेक नागरिक सिराेंचामार्गे तेलंगणा राज्यात जातात. तसेच शेकडाे कर्मचारी या मार्गाने प्रवास करतात. खड्ड्यांमुळे १०० किमीचा प्रवास करण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत आहे. यामध्ये अनावश्यक डिझेल व पेट्राेल लागून आर्थिक भार वाढत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणने लक्ष द्यावे, अशी मागणी माेटघरे यांनी केली आहे.