गडचिराेली : गाेगाव सिंचन याेजनेच्या पाटाचे काही दूर अंतरावर सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. त्यानंतर काही दूर कच्चा पाट आहे. बऱ्याच ठिकाणी हा पाट फुटला आहे. आता ही याेजना बंद आहे. राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून पाटाची दुरुस्ती करावी, जेणेकरून स्थानिक नागरिकांना राेजगार उपलब्ध हाेईल. तसेच सिमेंट काँक्रिटीकरण झाल्यास पाण्याचा अपव्यय टाळण्यासही मदत हाेईल.
चामाेर्शी मार्गाची दुरुस्ती रखडली
गडचिराेली : शहरातून चामाेर्शी मार्ग एकतर्फी बनविण्यात आला आहे. मात्र दुसरी बाजू अजूनपर्यंत बनविण्यात आली नाही. त्यामुळे एकाच बाजूने वाहने न्यावी लागत आहेत. नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे सभाेवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत.
काॅम्प्लेक्स परिसरातील रस्ते चकाचक
गडचिराेली : जिल्हा पाेलीस अधीक्षक कार्यालयासमाेरच्या विसापूरकडे जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. तसेच आता बाजूला गट्टू लावले जात आहेत. गट्टू सरकू नये, यासाठी बाजूला काँक्रिटचे बीम टाकले जात आहेत. या मार्गावर अनेक कार्यालये असल्याने या मार्गावरून नेहमीच वर्दळ राहते.
गडचिराेलीत दारूची विक्री जाेरात
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ही दारूबंदी नावापुरतीच असल्याचे दिसून येते. गडचिराेली शहरातील काही वाॅर्डामध्ये मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध हाेते. पाेलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने खुलेआम दारूविक्री केली जात आहे. काही दारू विक्रेत्यांनी तर आपल्या घराला बारचे स्वरूप दिले आहे. याठिकाणी चकनासुद्धा उपलब्ध हाेतो.
जड वाहनांमुळे नागरिक त्रस्त
गडचिराेली : गडचिराेली शहरातून छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ राहते. या वाहनांमुळे अनेक वेळा वाहतुकीची काेंडी हाेते. त्यात क्षमतेपेक्षा अधिक वजन राहत असल्याने रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. गडचिराेली शहराच्या सभाेवताली रिंगराेड हाेण्याची गरज आहे.
धानोरा येथील जीर्ण विद्युत खांब बदला
धानोरा : तालुका मुख्यालय असलेल्या धानोरा येथील अनेक वॉर्डातील अनेक विद्युत खांब जीर्ण अवस्थेत असून, ते कोसळण्याच्या मार्गावर आहेत. या जीर्ण खांबामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
गृहरक्षकांना पेन्शन लागू करण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या ३० वर्षांपासून अनेक नागरिक गृहरक्षक पदावर काम करीत आहेत. गृहरक्षकांना १ एप्रिल २०१४ पासून ४०० रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला. मात्र गृहरक्षकांना बारमाही रोजगार मिळत नाही. वर्षातून केवळ सहा महिनेच रोजगार दिला जातो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा निर्माण झाला आहे.
तुकुम येथे पसरली अस्वच्छता
धानोरा : तालुक्यातील तुकुम येथे सर्वत्र अस्वच्छता पसरली असल्याने गावात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. तुकुम येथील नाल्या पूर्णतः बुजले आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. पाणी साचून राहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांची होरपळ
गडचिरोली : गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्यात वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सिलिंडरमध्ये दर महिन्याला वाढ होत असल्याने महिनाकाठी सिलिंडरची उचल करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच पंचाईत होत आहे. सरकारने सिलिंडरच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ केली. अनेकांची सबसिडी बंद झाली आहे. अनेक नागरिक सरपणावरच स्वयंपाक करीत असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय आश्रमशाळेतील सोलर वॉटर हिटर बंदच
कुरखेडा : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी आश्रमशाळांना सोलर वॉटर हिटरचा पुरवठा करण्यात आला. मात्र आश्रमशाळेतील सोलर वॉटर हिटर वापर अभावी बंदच असल्याचे दिसून येते.
बँकांअभावी विकासावर परिणाम
गडचिरोली : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.
रेपनपल्ली-कमलापूर रस्त्याची दुरवस्था
कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमी रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले असून आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूल सुद्धा जीर्ण अवस्थेत आहेत.
मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातास आमंत्रण
आरमोरी : सायगाव मार्गावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असून या मार्गावर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचे कित्येकदा अपघात घडले आहेत. रात्रीच्या सुमारास मोठा खड्डा दुचाकीस्वारांना दिसत नसल्याने अपघातास आमंत्रण मिळत आहे. अशाप्रकारचे खड्डे या मार्गावर अनेक ठिकाणी अद्यापही कायम आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
निधी अभावी पंचायत समितीचे महत्त्व घटले
अहेरी : ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून पंचायत समितीकडे बघितले जाते. मात्र, मागील काही दिवसापासून पंचायत समितीला निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने पंचायत समितीचे महत्त्व कमी झाले आहे.
पाणीपुरवठा योजनांची कामे थंडबस्त्यात
कुरखेडा : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, मध्यंतरी निधीच मिळाला नसल्याने अनेक योजनांचे काम बंद पडले आहे. तर काही कामे कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे थांबले आहेत. काही दिवसातच उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या योजनांची कामे त्वरित मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.
अनेक कर्मचारी संगणकाबाबत अज्ञानी
गडचिरोली : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटी सोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे ज्ञान नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी आहे.
ऑनलाईन सातबारा झाला डोकेदुखी
एटापल्ली : ऑनलाईन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. ऑनलाईन सातबारा काढण्यासाठी अधिकचे पैसे मोेजावे लागत आहेत.
पट्टे वाटपासाठी अट शिथिल करा
धानोरा : गैर आदिवासी नागरिकांना वन पट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.
जननी योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
दुर्गम भागातील गावांना रस्ते नाहीत
गडचिरोली : जिल्हा निर्मितीला ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही अजूनही शेकडो गावे रस्त्यांनी जोडली गेली नाहीत. या गावांना पायवाटेने प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये या गावांचा संपर्क तुटतो. या गावांमध्ये रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त
गडचिरोली : गडचिरोली शहरातील विविध वॉर्डात नाल्या गाळाने भरून असल्याने डासांची पैदास वाढली आहे. अनेक ठिकाणी गटारे निर्माण झाली आहेत. अशा अस्वच्छतेचे ठिकाणी डुकरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने नाल्या व गटारे, डबक्याच्या परिसरात फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
बायोमेट्रिक प्रणालीचा फज्जा
भामरागड : शासनाने कर्मचाऱ्यांच्या नियमित हजेरी करिता अनेक कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविलेल्या आहेत. भामरागडातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोडले, तर बऱ्याच कार्यालयात ही बायोमेट्रिक मशीन बंद पडलेली आहे.
अनेक इमारतींवर वीजरोधक यंत्रणा नाही
अहेरी : उंच इमारतींवर वीजरोधक यंत्रणा बसविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या यंत्रामध्ये इमारतींवर वीज कोसळल्यास वीजरोधक यंत्र वीज खेचून घेऊन तिला सुरक्षितरीत्या जमिनीत पोहोचविते त्यामुळे इमारतीस व त्यात राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही, परंतु शहरातील अनेक इमारतींवर या यंत्राचा अभाव असल्याचे आढळून आले आहे.
सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षितच
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्रप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यातील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. शासनाच्या विविध योजना या भागात पोहोचत नसल्याने, नागरिकांमध्येही उदासीनता दिसून येते.
कुरखेडा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवा
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णालयात कुरखेडा, कोरची, देसाईगंज तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे १०० खाटांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, परंतु या मागणीकडे अनेक दिवसांपासून दुर्लक्ष होत आहे. सातत्याने मागणी करूनही आराेग्य विभागाने या रूग्णालयातील खाटांची संख्या वाढविली नाही. परिणामी येथून रूग्ण रेफर हाेत आहे.