सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सुबाभूळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
टोल फ्री क्रमांकांबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र, या टोल फ्री क्रमांकांबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकांवर ते संपर्क साधू शकत नाहीत. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
खोब्रागडी नदीपुलावर कठड्यांचा अभाव
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा गावाजवळून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवर १० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी या पुलावर लोखंडी संरक्षक कठडे लावण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांतच हे संरक्षक कठडे यंत्रणेने काढले. तेव्हापासून या पुलावर संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता आहे.
बसथांब्याची दुरवस्था वाढली
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य वाढलेे आहे.
अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, तिच्याकडे दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
हगणदारीमुक्ती कागदावरच
वैरागड : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी, शौचालये निकामी झाली आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हगणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे.
अल्पवयीन चालकांवर कारवाई हाेईना
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई हाेत नाही. याबाबत प्रशासन गप्प असल्याचे दिसून येते.