गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच होऊन नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय, शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात हाेऊ शकताे.
मनोऱ्याची रेंज वाढवा
धानोरा : तालुक्यातील मोहली येथे बीएसएनएलचा मनोरा आहे; परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनीचे मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी होत आहे.
सिरकाेंडाजवळ पूल बांधा
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
तलावात अतिक्रमण
धानोरा : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणामुळे तलाव नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वयोवृद्धांना पेन्शन द्या
आलापल्ली : जिल्ह्यात वयोवृद्ध ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रतिमहिना तीन हजार रुपये अर्थसाहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
तंमुसला प्रशिक्षण द्या
रांगी : अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र, समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रशिक्षण दिल्यास भांडण व तंटे याेग्य प्रकारे साेडविण्यास मदत हाेईल.
वाढीव टाकीचा अभाव
चामोर्शी : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी एका पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याची गरज आहे. नगरपंचायतीने याबाबत हालचाली कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चामोर्शी शहरातील काही वॉर्डांना अतिशय कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे.