आविसंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे तसेच दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे यांना माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेटून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. या निवेदनात कंबालपेठा-टेकडाताला-परसेवाडा-रेगुंठा-मोयाबीनपेठा-दर्सेवाडा-झेंडा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, रोमपल्ली-सिरकोंडा- झिंगानूर-कोपेला-पातागुडम या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, रेगुंठा, टेकडाताला, रंगय्यापल्ली, पेंटीपाका, गुमलकोंडा, रमेशगुडम या गावातील लिफ्ट एरिगेशन प्रकल्प तत्काळ मंजूर करून निधी वितरणासह काम सुरू करावे, सिरोंचा (धर्मपुरी) येथे बंद असलेली प्राणहिता उपसासिंचन योजना अतिरिक्त निधी देऊन दुरूस्त करण्यात यावी, सिरोंचा ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रूग्णालय घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील रस्ते दुरूस्त करा
By admin | Published: February 07, 2016 1:47 AM