राष्ट्रपतींना निवेदन : हस्तक्षेप करण्याची मागणीएटापल्ली : सूरजागड परिसरातील ग्रामसभांची सभा शनिवारी पार पडली. या सभेत सूरजागड प्रकल्पाला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने पाठविण्यात आले आहे. एटापल्ली तालुक्यातील सूरजागड परिसरात एकूण ७० ग्रामसभा आहेत. या सर्व ग्रामसभांनी संयुक्त बैठक घेऊन लोह खनिज प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. पेसा अंतर्गतच्या गावांमध्ये ग्रामसभांच्या सहमतीशिवाय प्रकल्प निर्माण करता येत नाही. मात्र या ठिकाणी कोणतीही संमती न घेता प्रकल्प बनविण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे राष्ट्रपती, सरन्यायाधीश यांनी हस्तक्षेप करून सदर प्रकल्पाला व उत्खननास मंजुरी देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ७० गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामसभांचा लोह खाणीस विरोध
By admin | Published: October 04, 2016 1:00 AM