आष्टी : नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अंतर्गत भागातील लहान रस्त्यांवरही अवजड वाहनामुळे रस्त्यांची वाट लागली आहे.
ग्रामीण भागातील सौरदिवे नादुरूस्त
आलापल्ली : अहेरी तालुक्यातील बहुतांश गावात सौर दिवे लावण्यात आले. परंतु, अनेक गावातील सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे सौरदिवे दुरुस्त करावे, अशी मागणी केली जात आहे.
इंटरनेटअभावी ग्राहक अडचणीत
धानाेरा : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. इंटरनेट सेवा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पतसंस्था आल्या अडचणीच
कुरखेडा : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज तसेच अन्य ठेवी भरण्यासाठी सामान्य नागरिकांकडे पैसाच नसल्याने पतसंस्थाही अडचणीत आल्या आहेत.
सांडपाणी अडल्याने आरोग्य धोक्यात
भामरागड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्याच्या बाजुला खताचे ढिगारे
चामाेर्शी : तालुक्यातील अनेक गावात म्हशी व गाय मालकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खत साठविले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होण्याची भीती आहे.
प्रसाधनगृह नसल्याने महिलांची कुचंबना
घाेट : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही प्रवाशी निवाऱ्याजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.
मोकाट जनावरांचा चौकाचौकात ठिय्या
गडचिराेली : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला. ही जनावरे रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांचा अपघात होण्याचा धोका आहे. मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.