राज्य शासनाने आठवडाभरापूर्वी जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीत गडचिरोली रेड झोनमध्ये होते. पण त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. त्यामुळे हा जिल्हा रेड झोनमधून बाहेर आलेला आहे. आता लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर त्याबाबतचे सविस्तर दिशानिर्देश अधिसूचनेद्वारे जारी केले जातील. त्यानुसार जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करावयाचे किंवा नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष त्यासाठी ठरविण्यात आले आहेत.
(बॉक्स)
म्यूकरमायकोसिसच्या ७ रुग्णांचे निदान
जिल्ह्यातील संशयित म्युकरमायकोसिसच्या ४ रुग्णांना नागपूर येथे पाठविण्यात आले होते. तसेच इतर तीन जण चंद्रपूर येथे उपचार घेत होते. त्यांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातील नागपूर येथे उपचार घेणारे दोन जण दगावले. गडचिरोली शहरातील एका ५८ वर्षीय रुग्णाने म्युकरमायकोसिसवर मात केली. दोन जण चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर दोघे नागपूर येथे उपचार घेत आहेत. मृतांपैकी एक जण कोरची येथील ५० वर्षीय पुरुष आणि दुसरा चामोर्शी तालुक्यातील ७३ वर्षीय पुरुष आहे.
(बॉक्स)
एका मृत्यूसह ३८ नवीन कोरोनाबाधित
- जिल्ह्यात गुरुवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर ३८ नवीन बाधित आढळून आले. याचवेळी १४१ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ५८७ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत. नवीन मृत्यूमध्ये कमलापूर येथील ८० वर्षीय महिला आहे.
- नवीन ३८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ५, आरमोरी ४, भामरागड तालुक्यातील २, चामोर्शी तालुक्यातील ७, धानोरा तालुक्यातील ६, एटापल्ली तालुक्यातील २, मुलचेरा तालुक्यातील ८, सिरोंचा तालुक्यातील ७ तर देसाईगंज तालुक्यातील एका जणाचा समावेश आहे.
- कोरोनामुक्त झालेल्या १४१ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ३७, अहेरी २५, आरमोरी ५, चामोर्शी ३०, धानोरा ६, एटापल्ली ९, मुलचेरा ७, सिरोंचा ११, कोरची २, कुरखेडा ५ तसेच देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे.