लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले. या कालावधीत गडचिराेली व अहेरी आगारांचे सुमारे १० काेटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. काेराेनापासून एसटीला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काेराेना कालावधीत एसटी बरेच दिवस बंद हाेती. त्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र, काही दिवस एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ निम्म्याच प्रवाशांची वाहतूक केली जात हाेती. या कालावधीत तर डिझेलचा खर्चही भरून निघत नव्हता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदाेलन सुरू केले आहे. ५५ व्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच आहे. काेराेनापूर्वी गडचिराेली आगाराला दररोज ९ लाख ५० हजार रूपये तर अहेरी आगाराला ७ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळत हाेते. मात्र, संपामुळे या संपूर्ण उत्पन्नावर पाणी पडले आहे.
एवढे नुकसान कधीच झाले नाही- एसटीच्या इतिहासातील हा सर्वात माेठा संप आहे. एसटीचे चाक नेहमीच ताेट्यात हाेते. मात्र एवढे नुकसान कधीच झाले नाही. संपामूळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटीला फार माेठी कसरत करावी लागणार आहे.
एसटीविना नागरिकांना आता प्रवासाची सवय झाली
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे अनेकांनी खासगी वाहने खरेदी केली आहेत. त्यामुळे एसटीशिवाय प्रवास करण्याची हळूहळू सवय पडत चालली आहे. एसटीशिवाय नागरिक प्रवासच करू शकत नाही. या भ्रमात एसटी कर्मचाऱ्यांनी राहू नये. अडचणीच्यावेळी प्रत्येक माणुस आपला मार्ग शाेधताेच.- आकाश देवतळे, युवक
एसटी कर्मचाऱ्यांंना बाहेरच्या बेराेजगारीचा अजूनपर्यंत अंदाज आलेला नाही. शासनाने पदभरतीची जाहीरात काढल्यास लाखाे युवक एसटीत काम करण्यासाठी अर्ज करतील. शासनाने आजपर्यंतची सर्वात माेठी पगारवाढ दिली असताना एसटी कर्मचारी आंदाेलनावर कायम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांविषयी जनतेच्या मनात असेलेली सहानुभूती आता संपत चालली आहे. - देवेंद्र शिंदे, युवक
५ महिने काेराेनाचा बसला फटकामागील दीड वर्षात काेराेनाची साथ हाेती. या कालावधीत जवळपास ५ महिने एसटीसेवा बंद हाेती. काेराेनाच्या कालावधीत एसटी सुरू झाली असली तरी पुरेसे प्रवाशी मिळत नसल्याने ताेटाच हाेत हाेता.
संपाचे ५५ दिवस
मागील ५५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपाच्या कालावधीत एसटीचे उत्पन्न जवळपास शुन्य आहे. वाहने बंद असली तरी देखभाल खर्च सुरूच आहे. त्यामुळे ताेटा वाढत चालला आहे.