गडचिरोली : प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सहकार विभागात उच्चपदापर्यंत पोहोचून छाप सोडणारे ॲड. मनीराम मडावी (वय ८९) यांनी निवृत्तीनंतर स्वत:ला समाजकार्यात झोकून दिले होते. मृत्यूनंतर आपला देह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामी यावा, यासाठी त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. २३ मे रोजी ॲड. मनीराम मडावी यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी धीरोदात्तपणा दाखवत पार्थिव नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द केले. मृत्यूनंतर कीर्तीचा दरवळ व देहरूपाने मनीराम मडावी हे या जगात राहणार आहेत.
मनीराम मडावी हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील साकोला तालुक्यातील एकोडीचे. परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी गडचिरोलीत जिल्हा उपनिबंधक म्हणून काही वर्षे सेवा बजावली, त्यानंतर त्यांनी नागपूर येेथे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था म्हणूनही काम पाहिले. याच पदावरून ते निवृत्त झाले. कर्तव्यदक्ष, समाजातील उपेक्षित-वंचित घटकांबद्दल कणव असलेला संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख होती.
निवृत्तीनंतर ते वकिली व्यवसाय करत, सोबतच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून समाजकार्यातही सक्रिय सहभाग असे. आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ अध्यक्षपदाची धुरा ते सांभाळत. या माध्यमातून त्यांनी आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले.
नागपूर येथील मानेवाडा वाॅर्डातील तुकडोजी चौकातील आदिवासी कॉलनी येथे २३ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. मृत्यूपश्चात अंत्यविधी न करता देहदान करावे, अशी इच्छा त्यांनी कुटुंबीयांकडे व्यक्त केली हाेती. त्यांच्या इच्छेचा आदर राखत कुटुंबीयांनी २४ मे रोजी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयास त्यांचे पार्थिव सुपूर्द केले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शोकसभेत जीवनकार्यावर प्रकाश
ॲड. मनीराम मडावी यांचे पार्थिव महाविद्यालयास सुपूर्द करण्यापूर्वी महाविद्यालयाच्या प्रांगणात शोकसभा झाली. यावेळी माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, परिषदेचे विदर्भ उपाध्यक्ष घनश्याम मडावी, राष्ट्रीय सदस्य जनार्दन पंधरे, डॉ. बलवंत कोवे, साहित्यिक वामन शेडमाके, परिषदेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नरेश गेडाम, विदर्भ सचिव मसराम, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मडावी, कुलगुरू रामदास आत्राम, दिनेश गेडाम, योगानंद उईके, कवडू येरमे, केशव तिराणीक, निवृत्त समाजकल्याण उपायुक्त आर. डी. आत्राम आदी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकून श्रद्धांजली वाहण्यात आली.