दहीवडे यांचा आरोप : सिरोंचात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा सिरोंचा : अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांच्या सततच्या मागणीनुसार सेवानिवृत्तीचा लाभ देण्याबाबतचे परिपत्रक शासनाने काढले आहे. मात्र तीन वर्षांच्या कालावधीत एकाही अंगणवाडी कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात आला नाही. यावरून शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केला आहे. सिरोंचा येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यातील २ लाख अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांनी तब्बल एक महिना संप करून सेवानिवृत्तीचा लाभ देण्यास शासनाला भाग पाडले. त्यानंतर शासनाने परिपत्रक काढून अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त झाल्यानंतर तिला १ लाख रूपये व मदतनीसाला ७५ हजार रूपये देण्याचे मान्य केले. ३ वर्षांच्या कार्यकाळात जिल्हाभरातील २५० पेक्षा जास्त सेविका तसेच मदतनीस सेवानिवृत्त झाल्या असल्या तरी आजपर्यंत एकाही कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन केवळ परिपत्रक काढून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे. सेवानिवृत्तीचा लाभ तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी ३ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनासंदर्भातही मेळाव्यात चर्चा करण्यात आली. आंदोलनाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुमन तोकलवार, विटाबाई भट, डी. एस. वैद्य, खैरूनिसा शेख, रामबाई कोठारी यांनी मेळाव्यादरम्यान केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
सेवानिवृत्तीचा लाभ रखडला
By admin | Published: March 11, 2017 1:44 AM