एटापल्ली : जिल्ह्यात मलेरियाची साथ पसरली असल्याने याबाबतचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतिश पवार यांनी एटापल्ली येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्ह्यात सुमारे ८ हजार ५१६ रूग्णांना मलेरियाची लागण झाली आहे. मलेरियाचे सर्वाधिक रूग्ण एटापल्ली व धानोरा तालुक्यात आढळून आले आहेत. त्याचबरोबर मंगळवारी एका शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आरोग्य संचालकांनी विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली व मलेरिया नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपसंचालक संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. आर. भंडारी, डॉ. असद फहीम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद अकिनवार उपस्थित होते. रूग्णकल्याण समितीचे अध्यक्ष प्रा. विनोद पत्तीवार, पं.स. सभापती दीपक फुलसंगे, उपसभापती संजय चरडुके यांनी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे संचालकांच्या लक्षात आणून दिले. गैरहजर राहणाऱ्या व मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यात रिक्त असलेली पदे भरण्याचे आश्वासन आरोग्य संचालकांनी दिले. (तालुका प्रतिनिधी)
आरोग्य संचालकांनी घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा
By admin | Published: November 20, 2014 10:51 PM