कुरखेडा : मराठी भाषा ही समृद्ध आहे. या भाषेचे जतन ही काळाची गरज आहे. इतर भाषेचा तिरस्कार न करता आपली मायबोली मराठी भाषेचा अधिकाधिक पुरस्कार करा, असे आवाहन येथील दिवाणी न्यायधीश तथा न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) एम. आर. बागडे यांनी केले.
उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत रविवारी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गाेविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर उपस्थित हाेते. आरेकर यांनी मराठी भाषेचे महत्त्व, संवर्धन व संरक्षण याबाबत आवश्यक जनजागृती व उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. दीपक बन्सोड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक सरकारी अभियोक्ता ए. पी. नाकाडे, संचालन न्यायालयाचे सहायक अधीक्षक आर. बी. निकम यांनी केले. आभार अधिवक्ता ॲड. उमेश वालदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक ए. डी. बारसागडे, कनिष्ठ लिपिक एस. व्ही. इनमवार यांनी सहकार्य केले.