जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन : जनतेसाठी कायद्याची अंमलबजावणी करा- आव्हाडगडचिरोली : उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकसहभाग यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या माहिती अधिकाराची अंमलबजावणी करतांना आपण जनतेसाठी आहोत या भावनेची जाण ठेवणे आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात तलाठ्यांसाठी आयोजित माहिती अधिकार कायदा २०१५ च्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रशिक्षण कार्यशाळेला यशवंतराव चव्हाण विकास प्रशिक्षण प्रबोधिनी (यशदा) पुणे येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. सवीश पाटील, प्रदीप देशमुख, राजेंद्र पांडे, तहसीलदार कुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कायदा व्यावहारिक, सैध्दांतिक आणि नैतिकदृष्ट्या सक्षम असल्याने या कायद्यातून जनतेत मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे. असे आव्हाड याप्रसंगी पुढे म्हणाले. उद्घाटन सत्रात बोलतांना डॉ. पाटील यांनी या कायद्याच्या निर्मितीचा इतिहास सांगितला. कायदा अस्तित्वात येवून आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या कायद्याचा ग्रामीण भागात थेट संपर्क तलाठ्यांच्या यंत्रणेशी येतो त्यामुळे चळवळ गतिमान व्हावी, यासाठी सर्व तलाठ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जास्तीत जास्त माहिती अद्ययावत करुन ती जनतेसाठी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. सोबतच स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिध्द करण्याचे बंधन कायद्यानेच घातलेले आहे. म्हणून ही माहिती खुलेपणाने व पारदर्शी पध्दतीने उपलब्ध करुन द्यावी, असे ते म्हणाले. तलाठ्यांचे सलग दोन दिवस दोन सत्रात सदर प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणात जिल्ह्यातील १०० तलाठी सहभागी झाले. प्रास्ताविक डॉ. पाटील, संचालन नितीन राऊत यांनी केले. प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नाझर मुडे व धनबाते यांनी परिश्रम घेतले.
तलाठ्यांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण
By admin | Published: October 16, 2015 2:00 AM