अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशुंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशुंनी अनेक हल्ले नागरिकांवर केले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
केंद्रांअभावी नागरिकांची पायपीट
कोरची : तालुका भौगोलिक विस्ताराने लहान आहे, परंतु तालुक्यात अनेक गावे आहेत. लोकांसाठी निर्माण करण्यात आलेली महा-ई-सेवा केंद्रे अपुरी आहेत. नागरिकांना ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
चामोर्शीत बांधकाम साहित्य रस्त्यावर
चामोर्शी : शहरातील विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी आहे.
कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने, परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे, परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात
गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र, सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.
पिशव्यांवरील बंदी कागदोपत्रीच
गडचिरोली : शासनाने प्लास्टीक पिशव्यांवर बंदीचे आदेश जारी केले आहेत, परंतु ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाड आकाराची प्लास्टीक पिशवी वापरणे व उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सूज्ञ नागरिकांनी केली आहे.