लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मोठी धरणे नसली तरी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसेखुर्द धरणामधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. याचा परिणाम म्हणजे या नद्यांच्या उपनद्यांचा जलस्तर वाढल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या आठवडाभर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. १ जूनपर्यंत पातापर्यंत जिल्ह्यात सरासरी ४२८.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्ष त्यापेक्षा जास्त म्हणजे ५२२.७ मिमी पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत १२२ टक्के पाऊस झाल्यामुळे बहुतांश सर्वच नद्या आणि नाले दुथडी भरून वाहात आहेत. त्यातच चार दिवसांपासून गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी सर्वच ठिकाणी वाढली आहे. शनिवारी सकाळी वडसात ही पातळी २०८.७८ मीटर, वाघोली बुटी येथे २०५.०३ मीटर, प्राणहिता नदीची पातळी महागाव गर्रा येथे १२१.२२ मीटर, गोदावरी नदीची पातळी कालेश्वरम येथे ९९.२२ मीटर, गाढवी नदीची पातळी आरमोरी येथे १९८.४० मीटर, सती नदीची कुरखेडा येथे २३४.३० मीटर, खोब्रागडी नदीची शिवनीत १९८.६७ मीटर, मांगदा टोला येथे २२.७० मीटर, कठाणी नदीची पातळी चव्हेला येथे २३७.४० मीटर, बाम्हणीत २०३.७० मीटरवर पोहोचली आहे. ही सर्व पातळी इशारा पातळीपासून थोडी कमी आहे. पण प्रवाह असाच वाढत राहिल्यास या नद्या इशारा पातळी व धोक्याची पातळी गाठू शकतात. शनिवारी गोसेखुर्द धरणाचे १३ दरवाजे सुरू होते. पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी रविवारी पाऊस झाल्यास नद्यांचा पूर वाढण्याची शक्यता आहे.एकाचा मृतदेह मिळालाकिष्टापूर व गुड्डीगुडम नाल्यात गुरूवारी दोघे जण वाहून गेले. या दोघांचाही शोध सुरू होता. शनिवारी दुपारी किष्टापूर नाल्यात वाहून गेलेला नागेश मलय्या कावरे याचा मृतदेह सिंधटोला गावाजवळ मिळाला. तर मलेश भोयर हा अजुनही बेपत्ता आहे. अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे यांनी किष्टापूर नाल्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
नद्यांनी गाठली धोक्याची पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:48 PM
जिल्ह्यात मोठी धरणे नसली तरी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसेखुर्द धरणामधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
ठळक मुद्देसतर्कतेचा इशारा : धरणांमधील विसर्गामुळे फुगल्या जिल्ह्यातील नद्या