सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या व सिराेंचा-आलापल्ली महामार्गाला जाेडणाऱ्या काेत्तागुडम-तमदाला मार्गाची निर्मिती १९७२ मध्ये तत्कालीन आमदारांच्या पुढाकाराने करण्यात आली. जवळपास ५० वर्षांचा कालावधी आजपर्यंत उलटला परंतु या रस्त्यावर साधे खडीकरणही झाले नाही. हा रस्ता कायम उपेक्षितच राहिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात चिखल तुडवतच ये-जा करावी लागते.
परिसरातील नागरिकांच्या साेयीसाठी तत्कालीन आमदार मुकुंदराव विठाेबाजी अलाेने यांच्या पुढाकाराने १९७२ मध्ये काेत्तागुडम-तमदाला ह्या दीड ते दाेन किती रस्त्याची निर्मिती झाली. तमदाला, मेडाराम, कारसपल्ली व सिराेंचातील शेतकऱ्यांना ह्या रस्त्यामुळे साेयीचे झाले. त्यामुळे वर्षभर शेतकरी व परिसराच्या गावातील नागरिक याच मार्गाने ये-जा करीत हाेते. परंतु पावसाळ्यात रस्त्यावर जागाेजागी चिखल असताे. त्यामुळे रहदारीस अडचणी येतात. परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत पाठपुरावा केला हाेता, परंतु काहीच उपयाेग झाला नाही. विशेष म्हणजे १९७२मध्ये सिराेंचा निर्वाचन क्षेत्रातून काॅंग्रेसचे मुकुंदराव अलाेणे यांनी जमनादास खाेब्रागडे यांचा पराभव केला हाेता. तेव्हा त्यांनी सिराेंचा येथे अनेक विकासकामे केली. यात सदर रस्त्याच्या बांधकामाचा सुद्धा समावेश हाेता. परिसरातील नागरिक या रस्त्याला माजी आमदारांच्या नावावरून मुकुंदराव रस्ता म्हणूनसुद्धा ओळखतात. गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याच्या बांधकामाची मागणी शेतकरी व परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
बाॅक्स
पक्के बांधकाम झाल्यास बारमाही रहदारी
मुकुंदराव मार्गाचे पक्के बांधकाम न झाल्याने नागरिकांना कारसपल्ली मार्गाने जावे लागते, परंतु कारसपल्ली मार्गावर नाला असल्याने पावसाळ्यात हा मार्ग अनेकदा बंद राहताे. त्यामुळे तमदाला (मुकुंदराव) मार्गाचे पक्के बांधकाम झाल्यास परिसरातील नागरिकांची साेय हाेईल. नागरिकांना कारसपल्ली मार्गाने जाण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय नागरिकांच्या वेळेची बचत हाेईल. वर्षभर नागरिकांना ह्या रस्त्याने ये-जा करता येईल. त्यामुळे रस्त्याचे पक्के बांधकाम करावे, अशी मागणी हाेत आहे.