तालुक्यातील बहुतांश रस्ते चकाचक आहेत. परंतु कुरखेडाकडे जाणाऱ्या शिवराजपूर - किन्हाळा या वर्दळीच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे. वर्दळीच्या मार्गाची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देसाईगंज तालुक्यातील बहुतांश रस्ते खड्डेमुक्त असून कुरूड फाटा -शिवराजपूर ते किन्हाळा या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. संपूर्णतः रस्ता उखडलेला असून, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याबाबतीत सातत्याने पाठपुरावा होत असूनही या एकाच रस्त्याकडे दुर्लक्ष हाेत आहे. अनेक वाहने क्षतीग्रस्त होऊन लहान मोठे अपघात नित्याने होत आहेत.
तालुक्यातील शंकरपूर ते डोंगरगाव हलबी व पुढे आरमोरीपर्यंत रस्ता नव्याने बनविण्यात आलेला आहे. पोटगाव, विहीरगाव, पिंपळगाव हलबी, रीठ, चिखली, डोंगरगाव हलबी, मोहटोला, किन्हाळा, फरी, शिवराजपूर, अरततोंडी, उसेगाव या गावांतील नागरिक याच मार्गाने प्रवास करतात. सात महिन्यांपूर्वी शंकरपूर ते डोंगरगाव हलबी व पुढे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. दीड वर्षांपूर्वी मोहटोला ते शिवराजपूरपर्यंत खड्ड्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर डांबर पडलेले नाही. अल्पावधीतच या मार्गावर मोठमोठे भगदाड पडल्याने व काही भागात संपूर्णतः हा डांबरी रस्ता भकास होऊन गिट्टी उखडल्याने रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
दरम्यान, डांबरी रस्त्यावरील डांबर निघून डांबराच्या कडा तयार झाल्याने अनेक वाहने घसरून पडून अपघातग्रस्त झालेली आहेत. हा मार्ग दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.