दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ अभियंता, नागपूर यांनी कुरखेडा रोडवरील वडसा-वडेगाव रेल्वे स्टेशनजवळचे रेल्वे फाटक २४ जुलै २०१७पासून बंद केले. त्यामुळे नवनिर्मिती भूमिगत पुलावरून मर्यादीत उंचीच्या उपमार्गावर दळणवळण वळते करण्यात आले होते. परंतु, या भूमिगत पुलातून बस, ट्रॅव्हल्स, मोठे ट्रक यासारखे जड वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे प्रशासन, नागपूर यांनी वडसा - नागपूर आणि वडसा - साकोली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था समपार असलेल्या वडसा - ब्रम्हपुरी रेल्वे मार्गावरील विर्शी - कब्रस्थान - शासकीय विश्रामगृहाकडे निघणाऱ्या राज्य महामार्गावरून वळवली होती.
(बॉक्स)
जड वाहनांना मिळणार दिलासा
या ठिकाणाहून जड वाहने मोठ्या प्रमाणात जात असल्याने हा रस्ता वारंवार उखडत असल्याने पावसाळ्यात चिखल व खड्डे पडून अपघात होत होते. उन्हाळ्यात प्रचंड धूळ उडत असे. यामुळे चालकांना वाहन चालविण्यासाठी प्रचंड त्रास होत होता. हा रस्ता कायमस्वरूपी व मजबूत बांधकाम होण्याबाबत स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती.
या मागणीची दखल घेऊन या रस्ता बांधकामाला येणाऱ्या ३.२७ काेटी रुपये मूळ किमतीच्या १८ टक्के कमी निविदाधारकाला २.८० काेटी रुपये किमतीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. हा रस्ता ८०० मीटर लांब व १२ मीटर रुंद राहणार आहे.
(बाॅक्स)
रस्त्यालगतच्या अतिक्रमणधारकांना नोटीस
देसाईगंज शहराच्या कन्नमवार वाॅर्डातील सार्वजनिक बांधकाम विभाग ते रेल्वे फाटकापर्यंत १२ मीटर रुंद रस्त्याच्या लगत पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधितांना नोटीसही बजावली आहे. त्यात ३० दिवसांच्या आत ते बांधकाम स्वखर्चाने काढून टाकावे, अन्यथा नगर परिषदेच्या यंत्रणेमार्फत काढण्यात येईल आणि त्यासाठी येणारा खर्च अतिक्रमणधारकांकडून दंडाच्या शुल्कासह सक्तीने वसूल करण्यात येईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी १ सप्टेंबरला बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.