दुर्लक्षच : जंगलातून पायवाटेने जावे लागते लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : तालुक्यातील दल्ली गावाला इतर गावांशी जोडणारा मुख्य मार्ग दोन वर्षांपासून जांभुळघाट लघु सिंचन प्रकल्पाच्या पाण्याने गडप झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शारीरिक कष्ट सहन करीत पायवाटेने जंगलातून मार्ग काढावा लागत आहे. मात्र प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. आंधळी (सोनपूर) ग्रा. पं. अंतर्गत येणारे दल्ली हे गाव चारही बाजूने घनदाट जंगलाने वेढलेले आहे. १५० ते २०० लोकसंख्या असून येथे १०० टक्के आदिवासी बांधव वास्तव्य करतात. मागील दोन वर्षापर्यंत हे गाव मालेवाडा-रामगड या मुख्य मार्गाशी डांबरीकरण झालेल्या रस्त्याशी जोडले होते. मात्र जांभुळघाट लघुसिंचन प्रकल्प येंगलखेडा या जलाशयाचे बांधकाम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले. पाण्याची साठवणूक सुरू झाली. या जलाशयाच्या पाण्याने अंदाजे दोन किमी लांबीचा मार्ग पूर्णत: बाधीत होत या गावातील रस्ता पाण्यात गडप झाला. यामुळे ग्रामस्थांसमोर आवागमनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तेव्हापासून येथील ग्रामस्थ पायवाटेनेच मार्गक्रमण करून इतर गावांशी व्यवहार करतात. गतवर्षी रोहयो अंतर्गत दल्ली ते बामनपदेवपर्यंत माती काम करून कच्चा रस्ता तयार करण्यात आला. मात्र सीडीवर्क, बोल्डर पिचिंग व मुरूम आदी कामे न झाल्याने हा मार्गही निरूपयोगी ठरला आहे. पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने प्रकल्पबाधीतांच्या पुनर्वसनाकडेही पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. ही समस्या लक्षात घेऊन जि. प. चे माजी उपाध्यक्ष जीवन नाट व विद्यमान जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी यांनी तत्काळ सर्वेक्षण करून दल्ली ते बामनपेठ रस्त्याचे काम करण्याची मागणी केली आहे.
प्रकल्पाच्या पाण्याने दल्ली गावाचा रस्ता गडप
By admin | Published: May 21, 2017 1:25 AM