सिराेंचा : गडचिराेली जिल्ह्याच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या सिराेंचा तालुक्याला तेलंगणा-छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. मात्र नद्यांवर पुलाचा अभाव हाेता. त्यामुळे येथील नागरिकांचा एकमेकांशी फारसा संपर्क नव्हता. परंतु प्राणहिता, इंद्रावती व गाेदावरी नदीवर पूल झाल्याने आंतरराज्यीय रहदारी,व्यवसाय वाढला तसेच नागरिकांचा प्रवासही जलद झाला. सिराेंचा तालुक्यात महामार्ग क्रमांक १६ ची अपेक्षा हाेती. मात्र ही अपेक्षा महामार्ग क्रमांक ६३ च्या रुपाने पूर्ण झाली. तिन्ही राज्यांना जाेडणारे रस्ते व पुलांच्या बांधकामामुळे नागरिकांची साेय झाली आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी लाेकांना छत्तीसगड व तेलंगणात जाण्यासाठी आसरअल्लीपासून खासगी वाहनाने पातागुडमला जावे लागत हाेते. त्यानंतर लहान-लहान नावेतून इंद्रावती नदी पार करावी लागत हाेती. तेव्हाच छत्तीसगड राज्यात प्रवेश व्हायचा. अनेकदा बैलबंडीने प्रवास करावा लागत हाेता. हा प्रवास सात ते आठ तासाचा हाेता. सिराेंचापासून पातागुडमपर्यंत तसेच मंचेरियल-चेन्नूर येथे जाण्यासाठी लहान नावेतून प्राणहिता नदी पार करावी लागत हाेती.नंतर खासगी वाहनाने चेन्नूर गाठावे लागत हाेते. वारंगल, हैदराबादला जाऊन येण्यासाठी दाेन ते तीन दिवस लागायचे. आता रस्ते व पुलांमुळे हा प्रवास २४ तासांचा झाला आहे. तिन्ही राज्यातील लाेकांना रस्ते व पुलांचा फायदा मिळत आहे.
बाॅक्स
साेयरिक जुळण्यात झाली वाढ
सिराेंचा तालुक्यातील नद्यांवर पूल व या मार्गाने पक्के रस्ते बांधण्यात आल्याने तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील लाेकांशी सिराेंचा तालुक्याचे संबंध वाढले आहेत. दरवर्षी १०० च्या आसपास विवाह जुळतात. दहा वर्षांपूर्वीच्या स्थितीच्या प्रमाणात आता साेयरिक जुळण्यात वाढ झाली आहे. याशिवाय आराेग्याच्या सुविधा घेण्यासाठी अनेक नागरिक तेलंगणा राज्यात जातात. विविध वस्तूंची खरेदी व विक्री करण्याकरिता नागरिक तिन्ही राज्यात ये-जा करीत असतात.