सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गटार लाईनसाठी खाेदलेल्या अंतर्गत रस्त्यांवर चिखल दिसून येतो. पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्याची याेग्य डागडुजी अथवा दुरुस्ती करणे आवश्यक हाेते; परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून पाणी साचलेले आहे. अनेक रस्ते चिखलाने माखलेले आहेत. नागरिक याेग्यप्रकारे पायीसुद्धा रस्त्याने जाऊ शकत नाहीत. रस्त्याने ये-जा करणारे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. अनेकजण जखमी झालेले आहेत. शहरात दाेन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. इंदिरा गांधी चौकापासून तर शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत मार्ग खोदून ठेवल्याने त्यात पाण्याची डबकी तयार झालेली आहेत. लहान मुलांसह नागरिकांनाही याचा धाेका आहे. पावसाळ्याला आताच सुरुवात झाली आहे. त्यात रस्त्यांची अशाप्रकारे वाट लागली. पावसाचा भर लागल्यानंतर रस्त्यांची काय अवस्था हाेणार, याची कल्पनाच न केलेली बरी, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.
प्रतिक्रिया...
जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी
चामाेर्शी मार्गाची एक बाजू खाेदून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एका बाजूने खाेलगट भाग आहे. याचा धाेका मुले व नागरिकांनाही आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, तेव्हाच लवकर राष्ट्रीय महामार्गाचे काम हाेईल. या समस्येबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविणार आहे.
- संजय कोचे, जिल्हा सचिव, राष्ट्रवादी काॅंग्रेस, गडचिरोली