गडचिरोली : राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजनानंतर बांधकामाला सुरुवात होईल, राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला फार मोठी गती मिळेल, राष्ट्रीय महामार्ग आपल्या प्रयत्नामुळे झाले आहेत, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करण्यास मंजुरी मिळाली. पहिल्या टप्प्यामध्ये गडचिरोली-मूल, गडचिरोली-आष्टी, देसाईगंज-साकोली, आरमोरी-नागभिड या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. संपूर्ण रस्ते तयार करण्यासाठी जवळपास पाच ते सहा हजार कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. काही रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे लागलीच सुरूवात होणार आहेत. निश्चित कालावधीत हे संपूर्ण रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केंद्र शासन करणार आहे, अशी माहिती खासदारांनी दिली. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष योगीता पिपरे, रवींद्र ओल्लालवार, सुधाकर येनगंधलवार, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, रेखा डोळस, नगरसेवक अनिल कुनघाडकर, मुक्तेश्वर काटवे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी) शिवाजी महाविद्यालयाजवळ राहणार कोनशीला गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या संपूर्ण राष्ट्रीय महामार्गांच्या उद्घाटनाचा सोहळा गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाजवळ होणार आहे. यासाठी धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाजवळ कोनशीला निर्माण केली जाणार आहे. ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले आहे.
रस्त्यांमुळे विकासाला गती मिळेल-अशोक नेते
By admin | Published: December 28, 2016 3:03 AM